विविध ‘अॅप्स’ विकसित करून प्रशासन अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:23 IST2019-03-23T22:22:40+5:302019-03-23T22:23:15+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी प्रशासकीय यंत्रणा पहिल्यांदाच विविध हायटेकअॅप्स विकसित करून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले विविध अॅप्स या काळात वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. याकरिता तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते.

विविध ‘अॅप्स’ विकसित करून प्रशासन अपडेट
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी प्रशासकीय यंत्रणा पहिल्यांदाच विविध हायटेकअॅप्स विकसित करून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले विविध अॅप्स या काळात वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. याकरिता तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने आयसीटी अॅप्लिकेशन्स तयार करण्यात आले आहेत. व्होटर हेल्पलाईन, पीडब्ल्यूडी अॅप, सुविधा, सी-व्हिजिल, समाधान असे सहा अॅप्स निवडणुकीच्या काळात वापरण्यात येणार आहेत. व्होटर हेल्पलाईन या अॅपमध्ये मतदाराचे नाव, ओळखपत्र आदी माहिती सहजरित्या उपलब्ध होणे शक्य होईल. पीडब्ल्यूडी अॅप दिव्यांग मतदारांसाठी विकसित करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना या अॅपद्वारे सहजपणे सुविधा मिळविता येणे शक्य होईल. विविध राजकीय पक्षांसाठीही सुविधा अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व परवानग्या राजकीय पक्षांना मिळविणे सोपे होणार आहे. आवश्यक पुरावे सादर केल्यास काही तासातच परवानगी देण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले.
प्रचाराच्या कालखंडात आचारसंहितेचा भंग होत असल्यास सामान्य नागरिकांसाठी सिव्हिजिल अॅप आहे. या अॅपवरून आचारसंहिता भंग झाल्याबाबतची तक्रार नागरिकांना करता येईल. शनिवारपर्यंत या अॅपवरून १० तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. हे अॅप थेट निवडणूक आयोगाशी जोडण्यात आले. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणा पुढे येते. सुविधा आणि समाधान या दोन्ही अॅपद्वारे तक्रार निवारणासाठी वापर केला जाणार आहे. १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या गाऱ्हाणी जाणून त्या सोडवणुकीसाठी तयार करण्यात आले आहे.
एक खिडकी कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एक खिडकी आणि माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष देखील त्याच मजल्यावर स्थापन करण्यात आला आहे. सोशल मीडिया, मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांवरील जाहिरातीवर खर्च नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून राहणार आहे. एक खिडकीतून विविध परवानग्या मिळणे सोपे होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिसूचना जारी होणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.