मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: May 15, 2014 01:07 IST2014-05-15T01:07:21+5:302014-05-15T01:07:21+5:30
चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी १0 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी नवीन उद्योग भवन येथे होणार असून मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
८0 सीसी टीव्ही कॅमेर्याची नजर : सायंकाळी ६ वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी १0 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी नवीन उद्योग भवन येथे होणार असून मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी ८0 सीसी टिव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
सकाळी ७ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष स्ट्राँग रुम उघडण्यात येणार असून ८ वाजता टपाल मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर लगेच ईव्हीएम मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ या प्रमाणे सहा विधानसभा मतदार संघासाठी ८४ टेबल लावण्यात आले आहे. मतमोजणीच्या २२ ते २५ फेर्या होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंतिम निकाल येणे अपेक्षित आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १७ लाख ५२ हजार ६१५ मतदार असून १0 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची टक्केवारी ६३.२५ एवढी आहे.
पत्रकारांसाठी स्वतंत्र मिडिया कक्ष उभारण्यात आला असून या ठिकाणी दूरध्वनी, फॅक्स, टिव्हीची सुविधा देण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल फोन नेण्यास आयोगाने प्रतिबंध घातला असून माध्यम प्रतिनिधींना मिडीया सेंटरपर्यंत मोबाईल व मुव्ही कॅमेरा घेऊन जाता येईल.
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्था बुरडकर सभागृह व तलाठी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी करण्यात आली असून त्यांना मतमतोजणी केंद्रात ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या उमेदवाराचे ४५0 मतमोजणी प्रतिनिधीउपस्थित राहणार असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था मतमोजणीच्या ठिकाणीच पेमेंट बेसिसवर करण्यात आली आहे.
निकालाचे एकत्रिकरण व अद्ययावतीकरण करण्यासाठी स्वतंत्र कम्युनिकेशन कक्ष उभारण्यात आला असून सतीश खडसे या कक्षाचे प्रमुख आहेत. आयोगाला प्रत्येक फेरीचा निकाल पाठविण्याची व संकेतस्थळावर निकाल अद्ययावत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नागरिकांनी उद्योग भवन परिसरात गर्दी करू नये, अशी विनंती डॉ. म्हैसेकर यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)