चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची मागणी
सास्ती : जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात शनिवारपर्यंत शिक्षण विभागाने माहिती मागितली आहे. समायोजन करण्याच्या दृष्टीने ही माहिती कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरणारी असून, पदोन्नतीनंतरच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सन २०१८-१९च्या शिक्षकेत्तर संच मान्यतेनुसार शाळेतील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा सहायक या पदाचे संस्था स्तरावर समायोजन करून, उर्वरित अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभाग माध्यमिक यांनी मागितलेली आहे, परंतु जिल्ह्यातील विविध संस्थांनी व शाळांनी सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देऊन त्यांचे प्रस्ताव मान्यतेकरिता शिक्षण विभागाकडे सादर केले होते, परंतु ते सर्व प्रस्ताव प्रलंबित असल्याने आणि या सर्व पदास सन २०१८-१९च्या शिक्षकेत्तर संच मान्यतेनुसार मंजुरी असल्याने, जिल्ह्यातीच समायोजनाची माहिती ही कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरणारी आहे. या माहितीनुसार होणाऱ्या समायोजनामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे.
शिक्षण विभागात प्रलंबित असलेले पदोन्नती मान्यतेचे प्रस्ताव प्रथम निकाली काढून मान्यता प्रदान करावी आणि त्यानंतरच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही करावी, अशी मागणी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी (माध्य) यांना चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर वासेकर, कार्याध्यक्ष अशोक पिंपळकर, सचिव प्रशांत हजारे व पदाधिकारी उपस्थित होते.