आदिलाबाद मार्ग बनला धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:27 IST2018-03-02T00:27:37+5:302018-03-02T00:27:37+5:30
गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे.

आदिलाबाद मार्ग बनला धोक्याचा
ऑनलाईन लोकमत
गडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. यावर करोडो रुपये खर्च केले आहे. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरु असते. मात्र या मार्गावर गतिरोधक नसल्याने येथे दररोज किरकोळ व मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग धोक्याचा बनला आहे.
या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बस स्टँड) व बाबुराव शेडमाके चौक (सावित्रीबाई फुले विद्यालय जवळ) गतीरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. विद्यालयीन तथा महाविद्यालयीन अल्पवयीन मुले भरधाव मोटार सायकल चालवित असल्याने दररोज अपघात घडत आहेत.
२१ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले शाळेजवळ याच शाळेचे शिक्षक राजेश मांढरे सकाळी शाळेत येत असताना भरधाव येणाºया मोटारसायकलने त्यांना उडविले. विशेष म्हणजे मोटारसायकलस्वार अल्पवयीन विद्यार्थी असून त्यांच्याकडे परवानासुद्धा नव्हता, असे कळते. शिक्षक मांढरे यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.
पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन तिनही चौकात वाहतूक शिपाई नियुक्त करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने तिनही चौकात गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले असून प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा अपघात घडू शकतो.