कन्नमवार यांच्या स्मारकासाठी अतिरिक्त निधी मंजूर
By Admin | Updated: April 8, 2016 00:52 IST2016-04-08T00:52:38+5:302016-04-08T00:52:38+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या मूल शहरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून...

कन्नमवार यांच्या स्मारकासाठी अतिरिक्त निधी मंजूर
वित्तमंत्री मुनगंटीवार यांचे प्रयत्न
चंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या मूल शहरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून २ कोटी ९५ लाख ३७ हजार रूपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या स्मारकासाठी ५ कोटी रूपयांचा निधी सन २०१३ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या स्मारकाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ३१ मार्चच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये यासंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मूल शहर ही कर्मवीर मा.सा. कन्नमवारांची कर्मभूमी. त्यांच्या १११ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक उभारण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी २८ जानेवारी २०१० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याकडे केली सुधीर मुनगंटीवार यांचा सततचा पाठपुराव्यामुळे तत्कालीन अर्थमंत्र्यांनी २०१०-११ च्या अर्थसंकल्पात मूल शहरात ५ कोटी रूपये निधी खर्चुन कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. १० जुलै २०१० रोजी या संदर्भात मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे १५ एप्रिल २०१३ रोजी मुनगंटीवार यांनी विधानसभेत हक्कभंगाची सूचना मांडली. त्याचदिवशी सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित करून स्मारक बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान केली. या स्मारकाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. बांधकामासाठी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)