समाजकार्याचे विद्यार्थी घडविणार आदर्श गाव

By Admin | Updated: February 14, 2016 01:10 IST2016-02-14T01:10:03+5:302016-02-14T01:10:03+5:30

भारतातील बहुसंख्य युवापिढी खेड्यांमध्ये वसलेली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.

Adarsh ​​Gawan to be a social worker student | समाजकार्याचे विद्यार्थी घडविणार आदर्श गाव

समाजकार्याचे विद्यार्थी घडविणार आदर्श गाव

वतन लोणे घोडपेठ
भारतातील बहुसंख्य युवापिढी खेड्यांमध्ये वसलेली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. या संकल्पनेतून प्रेरणा घेवून समाजकार्य विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भद्रावती तालुक्यातील गोरजा हे गाव पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. आगामी काळामध्ये गोरजा या गावाला आदर्श रूप देण्यासाठी हे विद्यार्थी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीच्यावतीने गोरजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामीण समाजकार्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
अंदाजे ७५० लोकसंख्येचे गोरजा हे गाव चंद्रपूर-नागपूर महामार्गापासून चार किलोमीटर आतमध्ये आहे. देशात एकीकडे बुलेट ट्रेन धावत असताना या गावामध्ये अद्याप महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाची बस पोहोचली नाही. ९० टक्के शेतकरी कुटुंबसंख्या असलेल्या या गावातील नागरिकांना आजही आरोग्य, वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांनाच सामोरे जावे लागत आहे.
शासनदरबारीही उपेक्षित असलेल्या गोरजा या गावाला समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि आठ दिवसीय निवासी ग्रामीण समाजकार्य शिबिराचे आयोजन केले. त्यामुळे नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्व गोरजावासीयांनी शिबिरार्थींचे स्वागत केले तसेच सहकार्यही केले.
गोरजा येथे सध्या महिला बचत गट, पुरूष बचत गट, भजनमंडळ, गुरूदेव सेवा मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, युवक मंडळ, क्रीडा मंडळ, तंटामुक्त समिती यांसारख्या शासकीय व खासगी अशा एकूण दोन डझनांपेक्षाही जास्त समित्या आहेत. या शासकिय, निमशासकीय व खासगी समित्यांना कार्यरत करून व त्यांच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विकासात्मक विविध योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यात योग्य समन्वय साधून व लोकांच्या सहभागातून गावाची सामाजिक, आर्थिक, भौगोलिक व राजकिय उन्नती करण्यासाठी विद्यार्थ्यांतर्फे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यात योग्य समन्वय साधून कृती आराखड्यानुसार गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. ममता ठाकूरवार, प्रा. सुभाष गिरडे, प्रा. किरणकुमार मनुरे हे या समितीचे समन्वयक असणार आहेत.
यावेळी प्रबोधनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
शिबिरार्थींच्या प्रयत्नाने येणा-या काळात गोरजा हे आदर्श गाव बनेल, असा आशावाद नागरिकांनीही व्यक्त केला आहे.

Web Title: Adarsh ​​Gawan to be a social worker student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.