नागभीड नगरपरिषद स्थापनेच्या हालचाली सुरू

By Admin | Updated: February 3, 2015 22:53 IST2015-02-03T22:53:32+5:302015-02-03T22:53:32+5:30

येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या

The activities of the establishment of Nagbhid Nagarparishad started | नागभीड नगरपरिषद स्थापनेच्या हालचाली सुरू

नागभीड नगरपरिषद स्थापनेच्या हालचाली सुरू

घनश्याम नवघडे - नागभीड
येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये नागभीड ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. त्याच प्रशासकीय पातळीवर येथील नगर परिषदेच्या स्थापनेबाबत हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार येथील तहसिलदारांनी अहवालही सादर केल्याची माहिती मिळाली आहे.
१६ आॅगस्ट २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिमूर येथील कार्यक्रमात चिमूर आणि नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी नगरपरिषद स्थापनेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या.
नगर परिषदेसाठी २५ हजार लोकसंख्या ही प्रमुख अट असून या अटीच्या पूर्ततेसाठी नागभीडसह सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी तुकूम या गावांचासुद्धा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही गावे नागभीड नगर परिषदेत समाविष्ट झाली तर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी नगर परिषद ठरणार आहे.
सध्या नागभीड येथे १७ सदस्यीय ग्रामपंचायत अस्तित्वात असून या स्वराज्य संस्थेला विकासाच्या दृष्टीने अनेक मर्यादा आहेत. कर आणि बाजार या व्यतिरिक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. या उत्पन्नाचा बराचसा भाग गावातील दिवाबत्ती आणि नाल्यांची सफाई यावर खर्च होतो. रस्ते, नाल्या आणि अन्य विकास कामासाठी ग्रामपंचायतीला आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहावे लागते. सदर लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये पदारुढ असलेल्या पदाधिकाऱ्यांना ‘अनुकूल’ असले तर ठीक नाही तर, सारेच मुसळ केरात. याच परिस्थितीमुळे अनेक ग्रामपंचायती २० वर्षापूर्वी ज्या अवस्थेत होत्या त्याच अवस्थेत आजही आहेत.
विश्वसनीय माहितीनुसार चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हे सुद्धा नागभीड नगर परिषदेसाठी आग्रही आहेत. नागभीड येथे नगर परिषद व्हावी यासाठी त्यांचा जिल्हाधिकारी पातळीवर पत्रव्यवहार सुरू आहे. येत्या आॅगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेची स्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Web Title: The activities of the establishment of Nagbhid Nagarparishad started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.