दरोडा, लुटमार व चिटफंडसारख्या अवैध कंपन्यांवर कारवाई करावी
By Admin | Updated: November 19, 2015 01:26 IST2015-11-19T01:26:53+5:302015-11-19T01:26:53+5:30
चंद्रपूर येथे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक जेव्हापासून रुजू झालेत तेव्हापासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खून, चोऱ्या, व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे.

दरोडा, लुटमार व चिटफंडसारख्या अवैध कंपन्यांवर कारवाई करावी
चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर येथे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक जेव्हापासून रुजू झालेत तेव्हापासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खून, चोऱ्या, व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. या घटनांवर वेळीच आळा घालून चिटफंडसारख्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनातून केली आहे.
दुचाकी वाहनावर स्वार महिलांचे मंगळसुत्र व चेन लुटणारे वडगाव प्रभाग तसेच साईबाबा वार्ड, स्नेहनगर, हवेली गार्डन या ठिकाणी वावर आहग. मागील महिन्यात सात ते आठ ठिकाणी घरफोड्या झाल्यात आणि स्टेडियम रोडला दुचाकीस्वारांनी तीन महिलांचे मंगळसुत्र ओढून नेले आणि राष्ट्रवादी नगर, तुलसीनगर येथील रहिवासी नारायण भानारकर व पुंडलिक कुंभारे यांच्या येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज पळविला. त्यांच्या येथे दरोड्यांचा खेळ तब्बल पाऊण तास चालला. पोलिसांना फोन करुनही तब्बल एक तासापर्यंत कोणीच घटनास्थळी आले नाही. जर पोलीस प्रशासन सर्तक असते तर हे दरोडेखोर आपल्या जाळ्यात अडकले असते. यानंतर असे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने सर्तक रहावे व पोलीस गस्त वाढविण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील वाहतुक नियंत्रण शाखेकडून सध्या चंद्रपूर शहरातील वाहतूक सुरळीत होत नाही आहे. त्यामुळे शहरामध्ये जागोजागी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी अशी सूचना वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात यावी व जागोजागी रस्त्यावर होणारे अतिक्रमण थांबविण्यात यावे, असेही म्हटले आहे.
चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे चंद्रपूर शहरामध्ये जवळजवळ ३० कंपन्यामार्फत सर्वसामान्य जनतेकडून १०० कोटी चिट फंडच्या नावावरती पैसा गोळा करीत असल्याची तक्रार दिली होती. परंतु अजूनही त्या कंपन्यांवर निर्बंध टाकण्यात आलेले नाही व कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लुट अजूनही सुरू आहे. त्यामुळे चिटफंड कंपन्यांवर गुन्हे नोंद करुन कारवाई करण्यात यावी तसेच तस्करांना सहकार्य करणाऱ्या खनिकर्म अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे नंदु नागरकर, सुनीता लोढीया, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर यांनी निवेदनातून केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)