पतंगासाठी नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:16+5:302020-12-31T04:28:16+5:30
चंद्रपूर : शहरात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री केल्यास किंवा मांजा वापरल्यास, साठवणूक तसेच वापर करताना आढळल्यास कारवाई ...

पतंगासाठी नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई
चंद्रपूर : शहरात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री केल्यास किंवा मांजा वापरल्यास, साठवणूक तसेच वापर करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा महानगर पालिकेतर्फे दिला आहे.
चंद्रपूर शहरात पतंग उडविताना पक्षी, प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर गुन्हे आहे. मकरसंक्रांतीच्या आधीच काही दिवस पतंगबाजी सुरू होते. ही पतंगबाजी महिनाभर सुरू असते. पतंगबाजी करताना काटाकाटीच्या स्पर्धेत चिनी व नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पतंगप्रेमींबरोबरच रस्त्यावर चालतानाही जीव मुठीत घेऊन फिरावे लागते. या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी तर काही मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे या मांजावर बंदी घालण्याची सूचना न्यायालयाने सरकारला केली.
बॉक्स
नायलॉन मांजाची माहिती देण्याचे आवाहन
राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली. या मांजाची विक्री व वापर सर्रास सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेने पथके गठित केली. मनपा हद्दीतील दुकानांना याबाबत सूचना देण्यात येत आहेत. आपल्या आजूबाजूला नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करताना कुणी आढळल्यास कळवावे, असे आवाहनही महानगर पालिकेने केले.