रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:47+5:302021-01-24T04:12:47+5:30

ठेवणाऱ्यांवर कारवाई चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या १२ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. ...

Action against those who park their vehicles on the road | रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई

रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई

Next

ठेवणाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या १२ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये बल्लारपूर पोलिसांनी तीन, ब्रह्मपुरी दोन, वरोरा एक व चंद्रपुरातील चार वाहनचालकांवर कलम भादंवि २८३ अन्वये शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरात लवकर आळा घालण्याची मागणी चंद्रपुरातील जनतेने केली आहे.

हिमायतनगर ते बुद्धगुडा रस्त्याची मागणी

जिवती : बुद्धगुडा हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाहीत. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा हा रस्ता तयार करण्याची मागणी बुद्धगुडा गावातील नागरिकांनी केली आहे.

तेलवासा-भद्रावती रस्त्याची दुरवस्था

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील तेलवासा ते सुमठाणा हा रस्ता आयुध निर्माणी चांदा यांच्या अखत्यारित येतो. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

योजनांची माहिती नागरिकांना द्यावी

घुग्घूस : शासनाकडून सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहेत. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

गडचांदूर : शहरातील डुकरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. नगर परिषदेने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पळसगाव येथे वन्यप्राण्यांचा हैदोस

चिमूर : तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत पळसगाव येथे रानडुकरांचा हैदोस सुरू आहे. गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा हैदोस सुरू आहे. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले. मात्र, कोणतीही उपाययोजना केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

ग्रामीण मार्गांवर

अवैध वाहतुकीला ऊत

भद्रावती : तालुक्यातील ग्रामीण मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, पोलीस व परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत असून काहींना जीव गमवावा लागला. पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.

विमा रक्कम तातडीने देण्याची मागणी

ब्रह्मपुरी : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील धानाचे पीक वाया गेले होते. यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाल्यास कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

Web Title: Action against those who park their vehicles on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.