१० अभियंत्यांविरूद्ध कारवाई
By Admin | Updated: November 19, 2016 00:49 IST2016-11-19T00:49:52+5:302016-11-19T00:49:52+5:30
जागतिक शौचालय दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामामध्ये हयगय ...

१० अभियंत्यांविरूद्ध कारवाई
चौघांना कारणे दाखवा : इतरांची वेतनवाढ रोखली
मिलिंद कीर्ती चंद्रपूर
जागतिक शौचालय दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या १० अभियंतासह इतर दोन कर्मचाऱ्यांविरोधात शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामध्ये चार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर सहा शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. एक सहायक लेखाधिकारी व एका वरिष्ठ सहायकालाही वेतनवाढीचा फटका बसला आहे.
शासनाने स्वच्छ भारत अभियान खुप गांभिर्याने घेतलेले आहे. त्याकरिता राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाणीपुरवठा योजनांचा निधी देताना स्वच्छता, हागणदारीमुक्ती आदींची अट लागू केली आहे. ज्या पंचायत समित्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले असेल त्या पंचायत समितीमधील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे अपेक्षित आहे. मात्र, स्वच्छतेच्या अटी पूूर्ण न केल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे.
या अभियंत्यांविरोधात कारवाई करताना स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण न करणे, हागणदारीच्या अटी पूर्ण न करणे आणि त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची कामे रखडली आहेत. शनिवारी जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त पंचायत समितीस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तत्पूर्वीच ही कारवाई करण्यात आलेली आहे. यापूर्वी स्वच्छ भारत अभियानात हयगय केल्यामुळे १४ बीडीओंना कारणे दाखधवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. आता स्वच्छतेअभावी राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे रखडली आहेत. त्यामुळे सीईओंनी ही कारवाई केली आहे.
वेतनवाढ रोखलेले अभियंता व कर्मचारी
चंद्रपूर जि.प. पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर. जी. तालेवार, सिंदेवाहीचे शाखा अभियंता ए. एन. जतपले, चंद्रपूरच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा रॉय, कनिष्ठ अभियंता एस. एम. मेश्राम, चिमूरचे कनिष्ठ अभियंता कैलास करजेकर, चिमूरचे कनिष्ठ अभियंता मंचमवार, चंद्रपूर येथील सहायक लेखाधिकारी डोर्लीकर व वरिष्ठ सहायक आर. व्ही. दरेकर.
कारणे दाखवा नोटीस बजावलेले उपअभियंता
चंद्रपूर उपविभागाचे उपअभियता -आर. व्ही. पराते
सिंचेवाही उपविभागाचे उपअभियंता- चंद्रसेन शामकुवर
राजुरा उपविभागाचे उपअभियंता- वाय. एम. इंगळे
चिमूर उपविभागाचे उपअभियंता- व्ही. टी. शेंडे