वेकोलीचे लालपेठ व घुग्घुस येथील राजीव रतन हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST2021-04-12T04:26:10+5:302021-04-12T04:26:10+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूदर लक्षात घेता वेस्टर्न कोलफिल्डस़ लिमी. चे चंद्रपूर शहरातील ...

वेकोलीचे लालपेठ व घुग्घुस येथील राजीव रतन हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करावे
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूदर लक्षात घेता वेस्टर्न कोलफिल्डस़ लिमी. चे चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पिटल व घुग्घुस येथील राजीव रतन हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करावे तसेच १०० बेडचे महिला रुग्णालयसुध्दा तातडीने कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि वेकोलीचे सीएमडी मनोजकुमार यांच्याशी त्यांची चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
खासगी रुग्णांलयामध्येसुध्दा बेडस् उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही चिंतेची बाब आहे. ऑक्सिजन बेडस्, व्हेंटिलेटर बेडस्सुध्दा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने वेकोलीचे चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पिटल व घुग्घुस येथील राजीव रतन हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करत उपलब्ध केल्यास यासंदर्भात मोठी उपाययोजना ठरेल, असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील १०० बेडेचे महिला रुग्णालयाचे नुकतेच उद्घाटन होवूनही सदर रुग्णालय कोविड रुग्णांसाठी उपलब्ध झाले नाही. वर्षभरापुर्वी कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासुन या विषयाचा पाठपुरावा करीत आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या आपण निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले. सदर विषयाकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. महिला रुग्णालयसुध्दा तातडीने कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.