पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद
By Admin | Updated: March 14, 2015 01:01 IST2015-03-14T01:01:41+5:302015-03-14T01:01:41+5:30
गोंदिया न्यायालयात पेशी करुन रेल्वेने चंद्रपूरला परत येत असताना मूल रेल्वे स्थानकवर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला आरोपी ...

पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद
मूल : गोंदिया न्यायालयात पेशी करुन रेल्वेने चंद्रपूरला परत येत असताना मूल रेल्वे स्थानकवर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला आरोपी आशिष धरमसिंग सोमूवंशी (२६) रा. मगरधन याला मूल पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यामुळे दोन निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर येथील पोलीस आशिष धरमसिंग सोमूवंशी याची २३ सप्टेंबर २०१३ ला गोदिंया न्यायालयात पेशी करून चंद्रपूर येथे परत आणले जात असताना रात्री मूल रेल्वे स्थानकावर रेल्वे काही मिनिटासाठी थांबली. यावेळी पोलीस हवालदार भगवान खोब्रागडे व मनोहर ढोक हे कर्मचारी निगरानीवर असताना आरोपीने रेल्वेतून उडी घेवून पळ काढला. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
सदर तपास मूल पोलिसांकडे आल्यानंतर पोलीस निरीक्षक जी.आर. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे श्रीराम कुमरे, सुनील मेश्राम, भरत चौधरी, प्रभाकर पिसे यांनी सापळा रचून रामटेक तालुक्यातील नगरधन या गावात आरोपीला जेरबंद केले. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)