२५ गावातील खातेदारांना बँकेसाठी मारावा लागतो ६० किमीचा फेरफटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:39+5:302021-07-18T04:20:39+5:30
देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील व देवाडा परिसरातील बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी पेसामध्ये येतात. देवाडा येथे विदर्भ कोकण ...

२५ गावातील खातेदारांना बँकेसाठी मारावा लागतो ६० किमीचा फेरफटका
देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील व देवाडा परिसरातील बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी पेसामध्ये येतात. देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. व्यवहार सुरळीत सुरू असताना २०१० मध्ये बँक शाखा बंद करण्यात आली. ती सुरू करावी, अशी मागणी आहे. नागरिकांना व्यवहार करण्यासाठी ३० किलोमीटरवर अंतरावरील राजुरा येथे जावे-यावे लागते. असा ६० किमीचा फेरफटका मारावा लागत आहे.
आदिवासी दुर्गम भागात देवाडा हे मोठे गाव आहे. सुमारे २५ गावे देवाडा गावाच्या संपर्कात आहेत. रविवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार व्यवस्थित सुरू आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँक नसल्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जावे लागते. महिला बचत गटांना दरमहा रक्कम उचल करणे, भरणे व कर्ज घेण्यासाठी राजुरा येथे जाणे अडचणीचे ठरत आहे. शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, कर्ज घेणे, बँकेत खाते उघडणे, निराधार श्रावण बाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी योजनांचा लाभ घेणे, अपंग व वयोवृद्ध नागरिकांना बँकेतून रक्कम घेण्याकरिता वेळ व आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन झाल्यामुळे जनधन योजना शेतकरी सन्मान योजना, शौचालयाचे बांधकाम वा तेंदुपत्ता रक्कम अशा कोणत्याही योजनेसाठी नागरिकांना आपले बचत खाते लिंक करावे लागते. यासाठी शेतीची कामे सोडून राजुराकडे धाव घ्यावी लागते. देवाडा सर्कलमध्ये ७० टक्के शेतकरी आहेत. त्यांचे जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बँकेच्या कामासाठी गेल्यास त्यांच्या एक दिवस व्यर्थ जातो. एका फेरीत काम झाले तर ठिक अन्यथा परत दुसऱ्या दिवशी पुन्हा राजुऱ्याला जावे लागते. प्रत्येक हंगामात असाच प्रकार घडतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येतात. योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.