महिनाभरापासून माळरानावर राहत असलेल्या गावकऱ्यांपैकी एका महिलेचा आकस्मिक मृत्यू; महाराष्ट्र तेलंगणच्या सीमेवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:25 IST2018-01-13T13:23:40+5:302018-01-13T13:25:39+5:30
महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या व तेलंगण व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने आता उघड्या माळरानावर रहात असलेल्या प्रेमनगरातील एका महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.

महिनाभरापासून माळरानावर राहत असलेल्या गावकऱ्यांपैकी एका महिलेचा आकस्मिक मृत्यू; महाराष्ट्र तेलंगणच्या सीमेवरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या व तेलंगण व आंध्रातील आरक्षण वादापोटी संभावित हल्ल्याच्या भयाने आता उघड्या माळरानावर रहात असलेल्या प्रेमनगरातील एका महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यापासून २७ कि.मी. अंतरावर प्रेमनगर हे गाव १० वर्षांपूर्वी वसले. तेथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या नागरिकांकरिता महाराष्ट्र सरकारने पिण्याच्या पाण्याची, विजेची व रस्त्याची व्यवस्थाही करून दिली. मात्र तेलंगणा व आंध्रप्रदेशातील आरक्षणाच्या वादामुळे बंजारा व आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला. प्रेमनगरची नोंद महाराष्ट्रासोबत तेलंगणातही करण्यात आली असल्याने आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार या नाराजीपोटी तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरवर हल्ला चढविला होता. गाव उठवा नाहीतर घरे जाळू अशी आक्रमक व हिंसक भूमिका तेलंगणवासियांनी घेतल्यामुळे प्रेमनगरातील नागरिकांनी ते गाव सोडून माळरानावर बस्तान मांडले होते. तेलंगणच्या नागरिकांनी या गावावर आक्रमण करून विवाहाचा मंडपही पेटवून दिल्याची घटना घडली होती. यावेळी अख्खअया गावाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
तेलंगणचे नागरिक पुन्हा हल्ला करतील या भयाने गावकऱ्यांनी गाव सोडून आपल्या गोठ्यात, शेतात वा नातेवाईकांकडे राहणे सुरू केले. थंडीचा कडाका सहन करीत लहान मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक उघड्या माळरानावर राहत आहेत. शनिवारी पहाटे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव गुणाबाई उत्तम जाधव असे असून तीही आपल्या शेतात राहत असल्याचे समजते.