बीआयटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:12 IST2019-01-30T23:12:02+5:302019-01-30T23:12:39+5:30
बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता.

बीआयटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता. अशातच त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याच्या मागणीसाठी बीआयटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी मृतदेह महाविद्यालयात नेऊन आंदोलन केले.
अमर महादेव नगराळे (३२) असे मृतकाचे नाव आहे. तो तालुक्यातील मानोरा येथील रहिवासी असून होमगार्ड म्हणूनही तो कार्यरत होता. अमर नगराळे हा मंगळवारी रात्री १० वाजता आपल्या एमएच ३४ एक्स ८१७० या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने येथून मानोराकडे जात होता. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. मृतक अमर हा बामणी येथील बिआयटीचा कर्मचारी होता.
बीआयटी कर्मचाºयांचे मागील आठ महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. थकित पगाराच्या मागणीकरिता अमर नगराळे हा उपोषणालाही बसला होता. वेतन मिळत नसल्याने अमर मागील अनेक महिन्यांपासून मानसिक तणावात होता. अशातच त्याचा असा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी बिआयटी येथील कर्मचाऱ्यांनी अमरचा मृतदेह थेट महाविद्यालयात नेला. आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याची मागणी रेटून धरली. दरम्यान महाविद्यालय व्यवस्थापनाने मृतकाच्या पत्नीला नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीआयटीमधील कर्मचाऱ्यांचे मागील काही महिन्यांचे वेतन थकित आहे. वेतन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. अमर नगराळे यांचा अपघाती मृत्यू झाला. ते संस्थेत नऊ वर्षांपासून होते. त्यांच्या पत्नीला नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
- संजय वासाडे, कार्याध्यक्ष, कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, बल्लारपूर