२०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: September 6, 2015 00:54 IST2015-09-06T00:54:21+5:302015-09-06T00:54:21+5:30

अनुदानाचा निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले संमतीपत्र देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारताना जामगाव कोमटी येथील तलाठी भारत पगाडे याला ..

Accepting a bribe of Rs. 200, Tulsi ACB net | २०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

२०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

खडसंगी : अनुदानाचा निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले संमतीपत्र देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारताना जामगाव कोमटी येथील तलाठी भारत पगाडे याला चंद्रपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहात पकडून अटक केली.
चिमूर तालुक्यातील भिसी येथील एका शेतकऱ्याची चिखली मोकासा येथे दीड एकर शेती आहे. राज्यशासनातर्फे सदर शेतकऱ्याला चालू शेती हंगामात धान अनुदानापोटी २७०० रुपयांचे अनुदान मंजूर झाले. परंतु सदर अनुदान परस्पर लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होत असल्याने बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी संबंधित बँक व्यवस्थापकाच्या नावे तलाठ्याचे संमतीपत्र आवश्यक होते. त्यानुसार संबंधित शेतकऱ्याने जामगाव (कोमटी) साजाचे तलाठी भारत पगाडे याची भेट घेतली तेव्हा या प्रमाणपत्रासाठी पगाडे याने २०० रुपयांची लाच मागितली. गरजेपोटी शेतकऱ्याने त्याला ही रक्कम दिली. त्यानंतर तलाठ्याने प्रमाणपत्र दिले. सदर संमतीपत्र वैनगंगा क्षेत्रिय बँक शाखा भिसीच्या व्यवस्थापकाच्या नावे होते. मात्र शेतकऱ्याच्या अनुदानाचा धनादेश वैनगंगा क्षेत्रिय बँकेऐवजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिसी शाखेत दाखल झाला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने पुन्हा तलाठी पगाडे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या नावाने संमतीपत्र तयार करून देण्याची विनंती केली. परंतु पगाडे यांनी पुन्हा २०० रुपये लाचेची मागणी केली. मात्र अगोदरच पैसे दिले असल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितल्यानंतर पगाडे यांनी संमतीपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे सदर शेतकऱ्याने यासंदर्भात थेट चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने शनिवारी चिमूर येथील तहसील कार्यालयात सापळा रचला. यादरम्यान, तलाठी पगाडे याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहात पकडून अटक केली. (वार्ताहर)

Web Title: Accepting a bribe of Rs. 200, Tulsi ACB net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.