चंद्रपूर : कामाचे देयक काढण्यासाठी कंत्राटदारांकडून लाच मागणाऱ्या दोन सरपंचासह, उपसरपंचाला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी ४१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. आंबेनेरीचे सरपंच संदीप सुखदेव दोडके (३०), बोरगाव (बुट्टी)चे सरपंच रामदास परसराम चौधरी (३९), बोरगाव (बुट्टी) उपसरपंच हरीश गायकवाड (४५) असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
तक्रारदार हे उमरेड येथील रहिवासी असून, व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांच्या पत्नीकडे कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र असल्याने त्यांनी चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आंबेनेरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विविध कामांचे साहित्य पुरवले होते. त्याचे थकीत देयकाचे धनादेश देण्याकरिता आंबेनेरी येथील सरपंच संदीप दोडके व बोरगाव (बुट्टी) चे सरपंच रामदास चौधरी यांनी तक्रारदाराला एकूण बिलाच्या पाच टक्के रकमेची म्हणजेच ७८ हजार ६०० हजारांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने याबाबतची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
तडजोडीअंती तक्रारदाराने मंगळवारी आंबेनेरी येथे संदीप दोडके यांनी स्वत:करिता दोन टक्के, इतर लोकसेवकांकरिता तीन टक्के, उपसरपंचाकरिता एक टक्के असे एकूण ४१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी चिमूर पोलिस ठाण्यात संदीप दोडके, रामदास चौधरी, हरीश गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नागपूर विभागाच्या वर्षा मत्ते, पोलिस निरीक्षक आशिष चौधरी, सहा. फौजदार सुरेंद्र सिरसाट, अनिल बहिरे, अमोल मेंघरे, अस्मिता मल्लेलवार आदींनी केली.