मुस्लिम आरक्षण तातडीने मंजूर करा
By Admin | Updated: February 9, 2015 23:11 IST2015-02-09T23:11:08+5:302015-02-09T23:11:08+5:30
महाराष्ट्र शासनाने मुस्लिमांना शिक्षणासोबतच नोकरीतही जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी येथे मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने जाहीर सभा

मुस्लिम आरक्षण तातडीने मंजूर करा
बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाने मुस्लिमांना शिक्षणासोबतच नोकरीतही जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी येथे मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने जाहीर सभा नगर परिषद बचत भवनासमोर पार पडली.
अध्यक्षस्थानी अॅड. झेड. के. खान होते. प्रा. जावेद पाशा, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संघटक बळीराम धोटे, हाजी मिर्जा परवेज बेग, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक भारत थुलकर, बामसेफचे जिल्हा संघटक डॉ. राकेश गावतुरे, बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, मूलनिवासी मुस्लिम मंचचे डॉ. सिराज खान, डॉ. किरण वानखेडे, हाजी सैय्यद अन्वर अली, मुश्ताक कुरेशी, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक फिरोज खान पठाण, आशिष हुसेन, अॅड. रफीक शेख, शेख अब्बास, मो. गयास यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. जावेद पाशा आरक्षणाच्या समर्थनात म्हणाले, काँग्रेस सरकारने मुस्लिम समाजासाठी पाच टक्के व मराठा समाजासाठी १६ टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मंजूर केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहीत यााचिकेमुळे मराठा आरक्षण पूर्णपणे आणि मुस्लिमांचे नोकरीविषयी आरक्षण स्थगित करून त्याऐवजी मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली. परंतु महाराष्ट्र शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव पारीत केला. त्याचवेळी सरकारने मुस्लिम आरक्षणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. हा मुस्लिम समाजावर अन्याय आहे. म्हणूनच, यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मैदानावर उतरलो आहोत. इतर वक्त्यांनी ही आरक्षणाच्या समर्थनार्थ आपले विचार मांडत सरकारने दुजाभाव सोडून मुस्लिमांना आरक्षण द्यावे, अशी मागणीे केली. संचालन अॅड. मो. नाजीम खान तर आभार मो. शरीफ गुरुजी यांनी केले. नायब तहसीलदार सचिन अहीर यांना मागणीचे निवेदन सादर केले. (तालुका प्रतिनिधी)