निर्मल ग्राम योजनेला गतिमान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST2021-01-08T05:36:15+5:302021-01-08T05:36:15+5:30
चिमूर : शासनातर्फे ग्रामीण भागात निर्मल ग्राम योजनेतून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखले; पण, कोरोनामुळे ही कामे ...

निर्मल ग्राम योजनेला गतिमान करा
चिमूर : शासनातर्फे ग्रामीण भागात निर्मल ग्राम योजनेतून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखले; पण, कोरोनामुळे ही कामे थंडावली. आता स्थिती बदलू लागली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशा स्थितीत काही नागरिक उघड्यावर शौचास जाऊन दुर्गंधीत भर घालत आहेत. निर्मल ग्राम योजना गतिमान केल्यास चित्र बदलू शकेल.
हॉस्पिटल वार्डात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
चंद्रपूर : शहरातील हॉस्पिटल वार्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर सुरू आहे. याच परिसरात ज्युबिली हॉयस्कूल व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वसतिगृह असल्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरातही मोकाट कुत्री शिरकाव करतात. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावी
सिंदेवाही : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने अवस्था बिकट आहे. रुग्णांना उपचारांसाठी ताटकळत राहावे लागते. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे आरोग्य सेवेसाठी खासगी रुग्णालयाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सरकार नगर परिसरातील खड्डे बुजवावे
चंद्रपूर : सरकार नगरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री वाहने चालविताना अपघात होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने खड्डे बुजवून समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गोंडपिपरीत प्रवाशांची गैरसोय
गोंडपिपरी : येथील बसस्थानक परिसरात एसटी कर्मचाऱ्यांसाठी असलेले एकमेव शौचालय वगळता सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिवहन मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
नाला घाणीने तुंबल्याने नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरातील बंगाली वार्डातील नाला घाणीने तुंबल्याने नागरिक त्रस्त आहेत. बालाजी वार्डातही विविध ठिकाणी घाण साचली. नाल्यांमध्ये डासांची उत्पत्ती झाली. मनपाने तातडीने स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
गडचांदूर-कोरपना रस्त्यांची दुरुस्ती करा
कोरपना : कोरपना ते गडचांदूर या मार्गाची दुरवस्था झाली. वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गडचांदूर येथे सिमेंट कंपन्या असल्यामुळे या मार्गावर नेहमीच जड वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याचे सिमेंटीकरण करून समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली,
तालुक्यात कृषिपूरक उद्योगांची गरज
कोरपना : तालुक्यामध्ये बेरोजगारांची संख्या वाढली आहे. पण, हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार वाममार्गाला लागण्याची शक्यता आहे. या तालुक्यात आता रोजगार मिळणे कठीण झाले. शेतीवरील भार कमी करण्यासाठी सरकारने कृषिपूरक उद्योग सुरू करण्याची मागणी युवकांनी केली आहे.
बाबूपेठ परिसरात अतिक्रमण वाढले
चंद्रपूर : येथील बाबूपेठ, लालपेठ परिसरातील काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात निवेदनही दिले आहे. मात्र, अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा
भद्रावती : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
गावागावांत डास प्रतिबंधक फवारणी करावी
गोंडपिपरी : परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली होती. मात्र, आता ती बंद झाली आहे. डेंग्यू, मलेरिया असे आजार होण्याची भीती आहे.
प्लास्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : बंदी असूनही शहरात प्लास्टिक वापर सुरूच आहे. मोकाट जनावरे प्लास्टिक खात असल्याने आजारग्रस्त होण्याची शक्यता आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होतो. मनपाने कोरोनाविरुद्ध जागृती करताना प्लास्टिक पिशव्या वापरांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली.
प्रवासी निवारा दुरुस्ती करण्याची मागणी
राजुरा : चंद्रपूर-आदिलाबाद राज्य महामार्गावरील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवघाट, दुल्हेशाह बाबांच्या दर्ग्यासह माथा, कुसळ, आदी गावांकडे जाण्याऱ्या रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहून वाट पाहावी लागत आहे.