लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर / भिसी : दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला कंटाळून मुलाने आपल्या वडिलांची नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिसी येथे सोमवारी उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. मच्छिंद्र आनंदराव मेश्राम (वय ५१) असे मृत वडिलांचे, तर संदेश मच्छिंद्र मेश्राम (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
मच्छिंद्र मेश्राम दारूच्या नशेत आपली पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करून मारहाण करत असत. रविवार, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मच्छिंद्र मेश्राम दारूच्या नशेत घरी आले आणि त्यांनी लहान मुलगा संदेश याला शिवीगाळ केली. संदेशने वडिलांना समजावत जेवण करण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी जेवण नाकारून पुन्हा दारू पिण्यास जाण्याचा हट्ट धरला. याच वादातून संदेशचा राग अनावर झाला आणि त्याने नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळून हत्या केली.
भावाला फोन करून सांगितली आपबीती
घटनेच्या वेळी आरोपीची आई लग्नानिमित्त बाहेरगावी गेली होती. सोमवारी सकाळी आरोपी संदेशने आपला मोठा भाऊ पंचशील मेश्राम याला फोन करून सर्व हकिकत सांगितली. पंचशीलने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता वडील जमिनीवर मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पंचशीलने स्वतः भिसी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दिली.
भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगाडे यांनी आरोपी संदेश मच्छिंद्र मेश्राम विरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्या केल्याचा बनाव
संदेशने पोलिसांना वडिलांनी आत्महत्या केल्याची बतावणी केली. मात्र पोलिसी खाकी दाखवल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या पुढे कथन केला.
रात्रभर गावात फिरत राहिला
पित्याचा गळा आवळल्यानंतर संदेशने मृतदेहावर ब्लॅकेट टाकले. मात्र त्याने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. घरात दुसरे कोणीही नसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. रात्रभर तो वॉर्डात फिरत राहिला. सकाळी त्याने स्वतःहून आपल्या मोठ्या भावाला फोन करून या भीषण कृत्याची माहिती दिली.
Web Summary : Fed up with his father's drunken abuse, a 19-year-old in Bhisi strangled him with a nylon rope. The son confessed to his brother, who reported it to the police. The accused has been arrested and charged with murder.
Web Summary : शराब के नशे में पिता के दुर्व्यवहार से तंग आकर, भिसी में एक 19 वर्षीय लड़के ने नायलॉन की रस्सी से उसका गला घोंट दिया। बेटे ने अपने भाई को कबूल किया, जिसने पुलिस को सूचना दी। आरोपी को गिरफ्तार कर हत्या का आरोप लगाया गया है।