मूलवासीयांना मुबलक पाणी पुरवठा होणार : नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:31+5:302021-03-24T04:26:31+5:30
मूल : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मूल शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या ...

मूलवासीयांना मुबलक पाणी पुरवठा होणार : नगराध्यक्ष
मूल : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मूल शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेची किंमत २८ कोटी ८८ लाख रूपये इतकी आहे. कोल्हापूर येथील लक्ष्मी सिव्हील इंजीनियरींग सर्वीसेस कपंनी या योजनेचे काम उत्कृष्टरित्या करीत आहे. त्यामुळे मूलवासीयांना लवकरच दोनदा पाणी पुरवठ्यासोबत मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती येथील नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मूल शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणि व्याप्ती लक्षात घेता ही वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. २०.३ लक्ष लिटर पाण्याची साठवण क्षमता आहे. याद्वारे एकूण ४० लक्ष लिटर पाणी दररोज मूल शहराला पुरवठा करण्यात येत आहे. हे प्रमाण आधीच्या तुलनेत अडीच पट असल्याचे प्रा. भोयर यांनी यावेळी सांगितले. मूल शहरात नळ धारकांची संख्या ४ हजार ६३१ आहे. त्यानुसार सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस शासकीय मानकानुसार १३५ लीटर प्रति व्यक्ती प्रति दिवस पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी पुरवठ्याची व्याप्ती ३५ टक्क्यांवरून ७५ टक्के एवढी झालेली आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पाणी पुरवठा सभापती अनिल साखरकर,बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, शिक्षण सभापती मिलिंद खोब्रागडे उपस्थित होते.
नळांना नवीन मीटर
मूल शहरातील सर्व नळांना मीटर लावण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले आहे. आतापर्यंत चार हजार नळांना मीटर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण मीटर लावल्यानंतर या योजनेअंतर्गत स्वयंचलित २४ तास पाणी पुरवठा नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. पाणी पुरवठा योजना राबवित असताना खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याची माहिती आणि मूल शहरातील आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली इतर विकास कामांची माहिती नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी यावेळी दिली.
शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे
पाणी पुरवठा योजनेत कोणताच गैरप्रकार झालेला नाही. संबधित कंत्राटदार निकषांप्रमाणे काम करीत आहे.त्यामुळे शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती अनिल साखरकर यांनी यावेळी दिली.