धरणात मुबलक; मात्र शहरात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:59 PM2019-04-24T23:59:33+5:302019-04-25T00:02:47+5:30

चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्षे लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी शहरातील पाण्याची बोंब मात्र कमी झालेली नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वैतागले आहेत.

Abundant in the dam; However, there is a scarcity in the city | धरणात मुबलक; मात्र शहरात टंचाई

धरणात मुबलक; मात्र शहरात टंचाई

Next
ठळक मुद्देअनेक वॉडांमध्ये अनियमित पाणीचंद्रपुरात पाण्याची कृत्रिम टंचाईटिल्लू पंपांमुळे समस्या वाढली

रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्षे लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी शहरातील पाण्याची बोंब मात्र कमी झालेली नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वैतागले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीचा मनमानी कारभार व महापालिकेचा दुर्लक्षितपणा, यासाठी कारणीभूत ठरत आहे. सध्या तप्त सूर्यकिरणे चंद्रपूरकरांना होरपळून टाकत आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात ८५ टक्के जलसाठा आहे. असे असतानाही शहरातील अनेक वार्डात कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे. धरणात साठा असतानाही नागरिकांना गरजेपुरते पाणीही मिळू नये, ही बाब संताप अनावर करणारी आहे.

चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणातही ४७.०८ टक्के जलसाठा आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बºयाच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले.
पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. चंद्रपूरचा उन्हाळा कूपरिचित आहे. मात्र समाधानाची बाब अशी की एप्रिल महिन्यातही चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात ८५.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. चंद्रपूर वीज केंद्राने नियमित पाण्याचा उपसा केला तरी पावसाळा लागेपर्यंत चंद्रपूरकरांना मुबलक पाणी मिळू शकते. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील अनेक वार्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. दादमहल वार्ड, भिवापूर, नेहरूनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, भानापेठ वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, वडगाव, बाबुपेठ परिसरातील अनेक वार्ड व तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. दोन-दोन दिवस नळ येत नाही. आलाच तर कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धार मोठी नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे.

शहराला हवे ४० दशलक्ष मीटर पाणी
चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात आहे. संपूर्ण शहराला दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला ९० ते १०० लिटर पाणी दररोज लागते. मात्र यापैकी ३० ते ३५ लिटरही पाणी दरडोई मिळत नाही.

तक्रारी आल्या की टँकरने पुरवठा
चंद्रपुरातील दादमहल वार्ड, भिवापूर, नेहरूनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, भानापेठ वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, वडगाव, बाबुपेठ परिसरातील अनेक वार्ड व तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. दोन-दोन दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवत असतानाही मनपा याबाबत गंभीर नाही. नागरिकांची ओरड झालीच तर त्यांच्या वार्डात टँकर पाठविला जातो.

भिकेचे पैसे दिले; तरीही पाणी नाही
येथील विठ्ठल मंदिर वार्ड व बालाजी वार्ड तब्बल आठ दिवस नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी यंग चांदा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली भिक मांगो आंदोलन करीत मनपावर मोर्चा काढला. भिक मागून जमा झालेले पैसे मनपा प्रशासनाला देऊन ‘पैसे घ्या, पण पाणी द्या’ अशी मागणी करण्यात आली. मात्र यानंतरही सदर वार्डात अनियमितच पाणी पुरवठा सुरू आहे.

पाईपलाईन तीच, कनेक्शन वाढले
पाण्याची टॉकी ते फिल्टर प्लॅन्टमध्ये असणारी पाईप लाईन मोठी असते. त्यानंतर मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी संबंधित प्रभागात पोहचते. त्यानंतर ३ ते ४ इंचांच्या पाईपमधून हे पाणी वितरित केले जाते. पूर्वी ५० कनेक्शनधारकांना ज्या पाईनलाईनवरून पाणी वितरित केले जाते, त्याच पाईनलाईनवर आता १०० ते २०० कनेक्शन आहेत. त्यामुळे पाहिजे तसा पाणी पुरवठा होत नाही.

उन्हाळ्यात धरणातील पाणी टिकावे, यासाठी मनपा प्रशासनाने एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. आता धरणात बऱ्यापैकी पाणी असल्याने नागरिकांनाही नळाद्वारे नियमित पाणी दिले जाईल. मनपाद्वारे अनेक ठिकाणी टाक्या ठेवल्या आहेत. त्याला चार-पाच नळ लावले आहेत. टँकरने यात पाणी टाकले जाते. काही तांत्रिक अडचणीमुळे काही वार्डात पाणी मिळाले नाही तर या टाकीमधून पाणी घेता येते. बालाजी वार्डातील पाईपलाईन खोदकामात दबली होती. ती आता पूर्ववत केली जात आहे.
- अंजली घोटेकर, महापौर, महापालिका, चंद्रपूर.

Web Title: Abundant in the dam; However, there is a scarcity in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी