आजी-माजी सरपंचासह तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाईचे संकेत
By Admin | Updated: September 16, 2015 00:59 IST2015-09-16T00:59:58+5:302015-09-16T00:59:58+5:30
तालुक्यातील मालडोंगरी येथील मनरेगामध्ये झालेल्या भ्रष्टाचारात दोषी आढळलेले नवनिर्वाचित सरपंच जयपाल दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली.

आजी-माजी सरपंचासह तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाईचे संकेत
रोहयो घोटाळा : ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील प्रकार
ब्रह्मपुरी : तालुक्यातील मालडोंगरी येथील मनरेगामध्ये झालेल्या भ्रष्टाचारात दोषी आढळलेले नवनिर्वाचित सरपंच जयपाल दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली. त्यानी पोलीस कोठडीत दिलेल्या जबानित माजी सरपंच गौतम भिकाजी धोंगडे यांना अटक झाली असून तत्कालिन ग्रामसेवकावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे संकेत आहेत.
मालडोंगरी येथे मागील वर्षी झालेल्या मनरेगा कामात एक लाखापेक्षा जास्त रुपयाच्या निधीची अफरातफर झाल्याचे चौकशीअंती निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्याने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीनंतर पूर्वीचे ग्रामरोजगार व आताचे नवनियुक्त सरपंच जयपाल दामोधर पारधी यांना अटक केली होती. त्यांना ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलीस तपासादरम्यान माजी सरपंच गौतम धोंगडे या माजी सरपंचाचे नाव समोर आल्याने त्यांनाही १३ सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. अटकेचे सत्र सुरू असतानाच पुन्हा काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात तत्कालिन ग्रामसेवकालाही अटक होण्याची शक्यता आहे.
मजुरांच्या पैशाची अफरातफर, शासनाची फसवणूक हे कारण रक्कमेपेक्षाही मोठे आहे. यापूर्वी पिंंपळगाव (भो.) येथेही असाच प्रकरण उघडकीस आला होता. परंतु मालडोंगरी प्रकरणात जी भूमिका पोलीस विभागाकडून घेतली जात आहे, ती भूमिका पिंपळगाव (भो.) प्रकरणात दिसून आली नाही. त्यामुळे पिंपळगाव येथील रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या महिला वर्गात पोलिसांप्रती प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)