अन आजीच झाली नातांची ‘आई’
By Admin | Updated: January 31, 2015 01:13 IST2015-01-31T01:13:17+5:302015-01-31T01:13:17+5:30
घरात वंशाचा दिवा नाही. मुलगी झाली, तिला मोठे करीत तिचा विवाह लावून दिला. मुलीचा आयुष्यवेल बहरून तिला दोन मुली झाल्या.

अन आजीच झाली नातांची ‘आई’
वरोरा : घरात वंशाचा दिवा नाही. मुलगी झाली, तिला मोठे करीत तिचा विवाह लावून दिला. मुलीचा आयुष्यवेल बहरून तिला दोन मुली झाल्या. आनंदाचे दिवस जात असतानाच मुलगी आणि जावयाचे निधन झाले. मातृत्व व पितृत्व हरविलेल्या दोन्ही मुलींसाठी ७५ वर्षीय आजीने ‘आई’ होत पुन्हा एकदा मातृत्वाचा प्रवास सुरू केला आहे. आपल्या नातनींसाठी या आजीची उतार वयातही संघर्ष सुरू आहे.
वरोरा तालुक्यातील खेमजई गावातील विठाबाई लक्ष्मण पोहनकर (७५) असे आजीचे नाव असून पती काही वर्षापूर्वी मरण पावले. त्याआधी एका मुलीचा विवाह लावून दिला. मुलीने काजल व कोमल अशा दोन मुलींना जन्म दिला. मुली मोठ्या होत असताना आजारपणाने पिता व नंतर मातेचाही मृत्यू झाल्याने दोन्ही मुली अनाथ झाल्या. आजीने पंचात्तरी ओलांडली आहे. शेती नाही आणि कुठला व्यवसायही नाही. घरी कुणीही कर्ता पुरुष नाही. अशा स्थितीत आपल्या नातनींची जबाबदारी ७५ वर्षीय आजीने स्वीकारली आहे. काजल ९ व कोमल १३ वर्षाची असून खेमजई येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आजीच्या झोपडीमध्ये राहत आहे. मुलींना शाळेतून गणवेश, पोषण आहार, पुस्तके मिळत आहे. दोन्ही मुली सुटीच्या दिवशी शेतात जाऊन कापणी, कापूस वेचणी आदी कामे करून दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ७५ वर्षीय आजीला मदत करीत आहे. खेमजई येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत कार्यरत सात महिला स्वयं सहाय्यता बचत गटांनी या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. मात्र ही मदत त्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी पुरेशी नाही. शासन निराधारासाठी अनेक उपाययोजना राबवित असताना या दोन निराधार मुलीपर्यंत शासनाची योजना येत नसल्याने अनेकांनी खंत व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
संघटनेशी सकारात्मक चर्चा
चंद्रपूर : जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले आहे. हे वेतन त्वरित अदा करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पशु व्यवसायी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान जि.प. प्रशासनाने संघटनेशी सकारात्मक चर्चा केली.