शेतात काम करताना वाघाने घातली झडप; महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2023 19:45 IST2023-04-26T19:44:58+5:302023-04-26T19:45:29+5:30
Chandrapur News वाघोली बुट्टी येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढविला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

शेतात काम करताना वाघाने घातली झडप; महिला जागीच ठार
चंद्रपूर : तालुक्यातील वाघोली बुट्टी येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढविला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, घटनेनंतर वाघ तिथेच बसून होता. लोकांची गर्दी जमताच वाघ त्यांच्या अंगावरही धावून गेला.
ममता हरिश्चंद्र बोदलकर (६५) रा. वाघाेली बुट्टी असे मृतक महिलेचे नाव आहे. ती आपल्या शेतात काम करीत असताना पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार केले. सदर घटनेची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. महिलेला ठार केल्यानंतर वाघ जवळच दबा धरून बसला होता. अर्ध्या तासातच घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. हे पाहून चवताळलेल्या वाघ गर्दीवर धावून गेला. त्यानंतर नागरिक सैरावरा पळू लागले. यात गोवर्धन नामक व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत झाली. त्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला.
ही माहिती वनविभागाला कळताच वनविभाग व पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळावरच पंचनामा करून महिलेचा मृतदेह सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे.