मोबाईलवर मॅसेज टाकून १६ वर्षीय विद्यार्थ्याची कीटकनाशक घेऊन आत्महत्या
By राजेश भोजेकर | Updated: July 11, 2023 18:50 IST2023-07-11T18:50:15+5:302023-07-11T18:50:25+5:30
याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

मोबाईलवर मॅसेज टाकून १६ वर्षीय विद्यार्थ्याची कीटकनाशक घेऊन आत्महत्या
चंद्रपूर : माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार गेल्या दोन महिन्यापासून आहे. मी स्वतःच्या मनाने आत्महत्या करतो आहे. यात कोणाला दोषी ठरवू नये, असा मजकूर मोबाईलवर ठेऊन एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे ही घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
साहिल सुनील ठक रा. घोडपेठ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. साहिल हा इयत्ता दहावीमध्ये केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी येथे शिक्षण घेत होता. साहिल हा यवतमाळ जिल्ह्यातील कोलगाव येथील रहिवासी आहे. तो शिक्षणासाठी घोडपेठे येथे अमोल कारेकर या मामाकडे राहत होता. सोमवारच्या मध्यरात्री त्याने घराच्या छतावर जाऊन कीटकनाशक प्राशन केले. तो त्या छतावरच पडून राहिला. घरात नसल्याने आजूबाजूला शोधाशोध घेतली पण तो आढळून आला नाही.
नातेवाईकांनी शेवटी मंगळवारी पहाटे भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्याचे लोकेशन तपासले असता तो घराच्या छतावर असल्याचे लक्षात आले. तो मृतावस्थेत पडून होता. त्यांच्या जवळ असलेल्या मोबाईलमध्ये, माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार गेल्या दोन महिन्यापासून आहे. मी स्वतःच्या मनाने आत्महत्या करतो आहे. यात कोणाला दोषी ठरवू नये, असा मजकूर लिहिलेला होता. भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.