लालपरीला आर्थिक आधार : निवडणूक विभागासोबत झाला करार
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे आर्थिक डबघाईला आलेले एस. टी. महामंडळ आता हळुहळू पूर्वपदावर येत आहे. यासाठी विविध उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन केंद्रापर्यंत पोहोचविण्याची तसेच परत आणण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक विभागाने एस. टी. महामंडळावर सोपवली होती. यासाठी तसा करार करण्यात आला असून, ९४ बसेस बुक केल्या आहेत. लालपरीनेही आपली जबाबदारी चोखपणे बजावली असून, या माध्यमातून ३० लाखांची कमाई केली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ६०५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे तालुका स्थळापासून ते मतदान केंद्रापर्यंत ईव्हीएम तसेच मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी निवडणूक विभागाने महामंडळाच्या ९४ बस बुक केल्या होत्या. या बसनी १४ जानेवारी रोजी संबंधित केंद्रांपर्यंत ईव्हीएम मशीन तसेच कर्मचाऱ्यांना पोहोचविले असून, १५ रोजी रात्री उशिरापर्यंत संबंधित तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन तसेच कर्मचाऱ्यांना परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अगदी दुर्गम भागातील गावातही एस. टी.ने ही जबाबदारी चोखपणे बजावली आहे. या माध्यमातून एस. टी.ला ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, कोरोना संकटाच्या काळामध्ये मोठी मदत झाली आहे.
आगारनिहाय बस
चंद्रपूर - ३२
राजुरा - १८
चिमूर - २४
वरोरा - २०
एकूण ९४
कोट
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चंद्रपूर विभागातून ९४ बसेस सोडण्यात आल्या आहेत. यातून काही प्रमाणात का होईना, महामंडळाला आर्थिक लाभ मिळाला आहे. या बस देताना प्रवाशांना त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
- आर. एन. पाटील
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर