४७ ग्रामपंचायतीसाठी ८५१ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: July 30, 2015 01:04 IST2015-07-30T01:04:34+5:302015-07-30T01:04:34+5:30
सावली तालुक्यात एकूण ४७ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ४७ ग्रामपंचायतीसाठी ८५१ उमेदवार आपले नशिब अजमावत आहे.

४७ ग्रामपंचायतीसाठी ८५१ उमेदवार रिंगणात
सावली : सावली तालुक्यात एकूण ४७ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ४७ ग्रामपंचायतीसाठी ८५१ उमेदवार आपले नशिब अजमावत आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यापासून डमी मतपत्रिका छापण्यापासूनचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे गावागावात निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे.
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रचार मोहीम चरण सीमेवर आतापासूनच पोहचली आहे. ४ आॅगस्टला होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक गावात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी शेतकरी बांधवात कमालीचे नैराश्य जाणवत आहे. गेवरा खुर्द, कढोली व पारडी या तीन ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत. कढोली आणि गेवरा खुर्द येथे महिला सरपंच होणार आहेत. त्यामुळे २२ महिला सरपंचासाठी मतदान होणार आहे. शेतीच्या हंगामातच निवडणुका आल्याने उमेदवारांची दमछाक होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाऊस नसल्याने एकीकडे शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. तर उमेदवारांच्या रणधुमाळीने काही मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे.
भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप, रिपाई, बसपा या सर्व पक्षांनी निवडणुकीत उडी घेतली तरी स्थानिक पातळीवर भाजपा-काँग्रेस, भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच रिपाई, बसपा, भारिप यासारख्या पक्षांचीही काही गावात अंतर्गत युती झाली आहे. अच्छे दिन ची वाट एक वर्षापासून पाहून थकलेल्या आणि मागच्या वर्षीचा हंगाम बुडूनही शासनाकडून काही मदत मिळाली नाही. त्यामुळे याचा दुष्परिणाम या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ५० ग्रामपंचायतीच्या ४२० सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. मात्र तीन ग्रामपंचायत आणि एकुण ६२ सदस्य अविरोध निवडून आल्याने ३५६ सदस्यांसाठी निवडणूक घेतली जात आहे.
त्याकरिता ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. दोन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक असताना एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरले नसल्याने तेथील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. दारूबंदीच्या काळात अनूचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासन व निवडणूक विभाग सतर्क झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)