प्रकल्पग्रस्तांना ८३ कोटींचा मोबदला वितरित
By Admin | Updated: October 20, 2015 01:04 IST2015-10-20T01:04:18+5:302015-10-20T01:04:18+5:30
पूर्वीच्या कोल अॅक्टमुळे शेतजमिनीला योग्य भाव मिळत नव्हता व तत्कालीन युपीएचे कोलमंत्रालयही याबाबत उदासीन

प्रकल्पग्रस्तांना ८३ कोटींचा मोबदला वितरित
वरोरा : पूर्वीच्या कोल अॅक्टमुळे शेतजमिनीला योग्य भाव मिळत नव्हता व तत्कालीन युपीएचे कोलमंत्रालयही याबाबत उदासीन होते. म्हणून आपण विरोधात असतानाही लोकशाही मार्गाने आपण आंदोलने केली. शेतकऱ्यांनी मला साथ दिली व संयम दाखविला त्याचेच आज चांगले फळ मिळत असून हीच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ची सुरूवात आहे. कोल मंत्रालयाने आता नियोजनबद्ध कार्यक्रम आखत असल्याने यापुढे कोळशाची टंचाई भासणार नाही. पर्यायाने विजेची भविष्यात कमतरता जाणवणार नाही, असे मत केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
एकोणा खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. वेकोलिच्या वतीने वरोरा तालुक्यात एकोना येथे सुरू होणाऱ्या कोळसा खाणीसाठी अधिग्रहीत जमिनीच्या मोबदला वितरण कार्यक्रम वेकोलिचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी घेण्यात आला. यावेळी आ.बाळू धानोरकर, वेकोलिचे निदेशक एस.एम. मल्ही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर माजी पालकमंत्री संजय देवतळे, एकोणाच्या सरपंच रूपा पिदुरकर, राहुल सराफ, विजय राऊत, रमेश पल्लीवार उपस्थित होते.
वेकोलिच्या माजरी क्षेत्रात एकोना क्रमांक दोन विस्तारीकरणात खुली कोळसा खाणीमध्ये जाणाऱ्या १ हजार २८ एकर शेतजमिनीला पूर्वी एकरी ४४ हजार दराने ४.५ करोड रूपये मिळणार होते.
मात्र या कार्यक्रमात एकरी ८ ते १० लाख रुपये दराने ८३ करोड रुपये मिळाले. पुर्वीच्या दरापेक्षा २० पट ज्यादा मोबदला व २२६ व्यक्तींना नोकऱ्या मिळवून दिल्याबद्दल ना. हंसराज अहीर यांचा याप्रसंगी ग्रामस्थांनी सत्कार केला.
एकोणा खाण क्रमांक दोन मध्ये येणाऱ्या एकोणा या गावातील ९१ प्रकल्पग्रस्तांना ८३ कोटी १७ लाख रुपयाचे धनादेश वाटप यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाप्रबंधक आभाचंद्र सिंग यांनी केले. संचालन बी.आर. शेगोकार तर आभार ए.के. दीक्षित यांनी मानले. या कार्यक्रमाला अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
३६ महिन्यात ३६ खाणी सुरू होणार
४केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर नोव्हेंबर १४ मध्ये नागपूरला केंद्रीय मंत्री व वेकोलिचे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. वेकोलिच्या विकासात अडचण निर्माण करणाऱ्या कायद्यावर चर्चा करण्यात आली. त्यात एकुण २३ कायदे बदलविण्यात आले. या बदलामुळे तोट्यात चालणाऱ्या वेकोलिला चांगले दिवस आले. त्यामुळे वेकोलिने गेल्या ८ महिन्यात ८ नवीन खाणी सुरू केल्या.आगामी ३६ महिन्यात वेकोलि ३६ खाणी सुरू करणार आहेत. स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम वेकोलि राबविणार असून यातून वर्षाला सहा हजार व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये शेतकरी कुटुंबातील व इतर बेरोजगारांचा समावेश असणार असल्याची माहिती वेकोलिचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्रा यांनी दिली.
१०३ वर्षीय वृद्ध महिलेचा सत्कार
४एकोणा येथील खुल्या कोळसा खाणीत कासुबाई पैकाजी बोथले या १०३ वर्षीय वृद्ध महिलेच्या नावावर ४० एकर शेती होती. त्यातील ३४ एकर शेती कोळसा खाणीमध्ये गेली. याचा मोबदला घेण्यासाठी कासुबाई कार्यक्रमस्थळी येऊन प्रकल्पग्रस्तांमध्ये बसल्या. ही बाब ना. अहीर यांना समजताच त्यांनी कासुबाईजवळ जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करीत व्यासपीठावर नेऊन ना. अहीर यांनी आपल्या शेजारी बसविले. त्यानंतर कासुबाईंचा सत्कार केला.
केंद्राचे निर्णय चांगले - बाळू धानोरकर
४शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकार चांगले व हितकारी निर्णय घेत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नोकऱ्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात आगामी काळात अनेक खाणी सुरू होत आहे. पण खाणी चालू झाल्याने प्रश्न संपत नाही तर पुनर्वसनासारखे नवीन प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न प्राधान्याने सोडवावे तसेच कोल रायल्टीमधून जमा होणाऱ्या महसुलापैकी ४२ टक्के निधी जिल्ह्याच्या विकासासाठी खर्च करावा, असे मत आमदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.