बीआयटी उभारणार ८०० शौचालये
By Admin | Updated: October 7, 2015 02:07 IST2015-10-07T02:07:02+5:302015-10-07T02:07:02+5:30
ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करीत बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने (बीआयटी) बल्लारपूर ...

बीआयटी उभारणार ८०० शौचालये
गोदरीमुक्तीचा संकल्प : विद्यार्थ्यांसाठी अभियंते घेणार पुढाकार
चंद्रपूर : ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करीत बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने (बीआयटी) बल्लारपूर तालुक्यातील दहा गावांमध्ये ८०० शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाविद्यालयातील एमबीएचे विद्यार्थी आणि बीआयटीचे अभियंते पुढाकार घेणार आहेत.
अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या उपस्थितीत या संदर्भात अलिकडेच एक बैठक पार पडली. यावेळी सरपंच सुशीला मडावी (कळमना), शिवकला आत्राम (किन्ही), सविता धोडरे (मानोरा), शकुंतला टोंगे (कोर्टी मक्ता), शंकर खोब्रागडे (पळसगाव), अर्चना वासाडे (आमडी), वासुदेव येरगुडे (किन्ही) आणि इटोलीचे सरपंच गोपाल बोभाटे बैठकीत सहभागी झाले होते.
मागील काही वर्षांपासून बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजीतर्फे ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सामूहिक शेतीच्या माध्यमातून करण्याचा प्रकल्प बीआयटीने उभारला आहे. आता बीआयटीच्या परिसरात असणाऱ्या गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांना आजही उघड्यावर शौचास जावे लागते. शासनाच्या आवाहनाला जनतेकडून तसा प्रतिसाद दिसत नाही.
शौचालय बांधण्यासाठी शासनाने १२ हजार रुपयाचे अनुदान जाहीर केलेले असताना बऱ्याच लोकांना शेतीच्या कामामुळे व इतर व्यस्ततेमुळे शौचालय बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणे कठीण होवून बसले. या विषयाचा अभ्यास बीआयटीने केल्यानंतर एका दिवसात तयार होणारे शौचालय बांधून दिल्यास अनेक गावे गोदरीमुक्त होऊ शकतात. ही संकल्पना समोर आली. त्याच आधारावर प्रायोगिक तत्वावर येनबोडी येथे एक शौचालय उभारण्यात आल्यानंतर परिसरातील कळमना, किन्ही, मानोरा, कोर्टीमक्ता, पळसगाव, आमडी, इटोली, कोठारी येथील सर्वेक्षण बीआयटीच्या माध्यमातून करण्यात आले. कळमना येथे २८, मानोऱ्यात ८०, कोर्टीमक्ता येथे ३०, पळसगाव ६०, आमडी येथे ३०, इटोली येथे ३० तर कोठारी येथे १७५ याप्रमाणे इतर गावांचा विचार केला असता एकूण ८०० शौचालय उभारल्यास दहा गावे गोदरीमुक्त होऊ शकतात, असे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या अनुदानाचा वापर करीत शौचालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, चंदा सोयाम, उपसरपंच सुनील बावणे, वासुदेव येरगुडे, मधुकर बोंडे, गोविंदा उपरे, धाडू दुधबळे यांच्यासह सरपंच उपसरपंचाची व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)