गडचांदूरमध्ये एकाच रात्री आठ घरफोड्या
By Admin | Updated: October 29, 2014 22:48 IST2014-10-29T22:48:11+5:302014-10-29T22:48:11+5:30
दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत गडचांदूरमध्ये चोरट्यांना हात साफ केले आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदी वातावरणामध्ये विरजण पडले आहे. तब्बल आठ जणांच्या घरी एकाच रात्री

गडचांदूरमध्ये एकाच रात्री आठ घरफोड्या
गडचांदूर : दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत गडचांदूरमध्ये चोरट्यांना हात साफ केले आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदी वातावरणामध्ये विरजण पडले आहे. तब्बल आठ जणांच्या घरी एकाच रात्री चोरी झाल्याची घटना गडचांदुरातील शिक्षक वसाहतीत घडली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. यात नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला. हे कळू शकले नाही. या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकजण बाहेरगावी जाण्याचा बेत आखत असतो. यंदा शाळकरी विद्यार्थ्यांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना चार दिवसांची सुट्टी मिळाली. बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. गडचांदूर येथील शिक्षक वसाहतीतील रमेश दरेकर, विजय राठोड, रामप्रभू नागे, उत्तम जाधव, गायकवाड, गौतम व बोढे यांचे किरायदार असे एकूण आठ जण दिवाळीनिमित्त बाहेरगावी आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे या घरांना मागील काही दिवसांपासून कुलूप लागलेले होते. कुलूपबंद घरांवर अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आपला डाव साधला. या आठही नागरिकांच्या घरी एकाच रात्री चोरी करुन अज्ञात चोरटे पसार झाले. मंगळवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यातील अनेक नागरिक बाहेरगावी असल्यामुळे त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधू चोरीची माहिती देण्यात आली. पोलीस तपास सुरु असल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती मिळाली नाही. एकाच रात्री आठ घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नगारिकांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे. औद्योगिक वसाहत असल्याने बाहेरराज्यातून मोठ्या संख्येने येथे नागरिक वास्तव्यास आहे. सणानिमित्त ते बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. (शहर प्रतिनिधी)