१७ जागांसाठी ७६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

By Admin | Updated: October 11, 2015 02:19 IST2015-10-11T02:19:46+5:302015-10-11T02:19:46+5:30

येथील नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत १७ जागांसाठी ७६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

76 nomination papers for 17 seats for filing nominations | १७ जागांसाठी ७६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

१७ जागांसाठी ७६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

पोंभुर्णा : येथील नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत १७ जागांसाठी ७६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, शुक्रवारी अर्जाची छानणी करण्यात आली. छाननी दरम्यान कोणत्याही अर्जात त्रुटी आढळून न आल्याने ७६ नामांकन अर्ज कायम ठेवण्यात आले. १९ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याचे शेवटची तारीख असली तरी काही महिला उमेदवारांनी आपल्या वॉर्डात प्रचार मोहिमेला सुरुवात केली असल्याने निवडणुकीला वेगळा रंग चढला आहे.
नव्यानेच निर्माण झालेल्या पोंभूर्णा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबरला होत असून गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७६ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ व तहसीलदार हरिश माठे यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केले.
पोंभूर्णा नगरपंचायतीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने नागरिकांसह इच्छुक उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी तहसीलदार कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, बसपा, रिपाइं, अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी समर्थकांसह नामांकन अर्ज दाखल केले.
प्रथमच होत असलेली पोंभुर्णा नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी नऊ जागांवर महिलांना तर आठ आठ जागांवर पुरुषांना समाधान मानावे लागणार आहे. या निवडणुकीत सुमारे चार हजार ९७८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात येणारा हा भाग असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीची सत्ता आपल्या पक्षाकडे राहण्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच भाजपा पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी कानमंत्र दिला आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, घनश्याम मुलचंदानी, गजानन गावंडे, विनोद अहीरकर, संजय महाडोळे, वागदरकर, पडवेकर यांनीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन जोरदार फिल्डींग लावल्याचे समजते. यामध्ये शिवेसनासुद्धा मागे नसून आमदार बाळू धानोरकर यांनी आपली चमू तयार करुन कार्यकर्त्यांसह पोंभूर्णा परिसर पिंजून काढला.
एकूणच या निवडणुकीला आता वेगळा रंग चढत असून पान टपरी चालकांना मात्र सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी पोंभूर्णा ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता होती. पंचायत समितीवर आणि बाजार समितीवरसुद्धा भाजपाची सत्ता असल्याने आणि पालकमंत्री मुनगंटीवार यांचे हे क्षेत्र असल्याने नगरपंचायतीवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा मात्र मागे पुढे पाहणार नसल्याचे हौस्या- गौश्यांमध्ये चर्चा सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 76 nomination papers for 17 seats for filing nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.