सैनिक शाळेकरिता मिळणार ७६ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:01:07+5:30
सैनिक शाळा हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी प्रमुख निर्णय म्हणजे चंद्र्रपूरची सैनिकी शाळा होय. भारतातील २६ सैनिक शाळांपैकी अतिशय उत्तम वास्तू चंद्र्रपुरात पूर्ण झाली आहे.

सैनिक शाळेकरिता मिळणार ७६ कोटींचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील सैनिक शाळेच्या बांधकामासाठी ७६ कोटींचा निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने सोमवारी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सैन्य दलाच्या माध्यमातून लवकरच लढाऊ विमान, रणगाडे आदी साहित्यांसह ६ अश्व सैनिक शाळेत उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असतानाही राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोट्यवधींचा हा निधी खेचून आणल्याने मोठी उपलब्धी मानली जात आहे.
सैनिक शाळा हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी प्रमुख निर्णय म्हणजे चंद्र्रपूरची सैनिकी शाळा होय. भारतातील २६ सैनिक शाळांपैकी अतिशय उत्तम वास्तू चंद्र्रपुरात पूर्ण झाली आहे. पहिली सहाव्या वर्गाची तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांच्या माध्यमातुनच आमदार मुनगंटीवार यांना सैनिक शाळेच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली. चंद्रपूर व बल्लारपूर मार्गावरील भिवकुंड जवळील १२३ एकरातील सैनिक शाळेची वास्तू पूर्णत्वास आली. शाळेत भारतातील अद्ययावत सैनिक संग्रहालय आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू येथील सैनिकी संग्रहालयापेक्षाही अधिक उत्तम असे हे संग्रहालय आहे. ताडोबा पर्यटकांनाही सैनिक शाळेच्या दर्शनी भागात भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली. आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २०२० सत्रापासून मुलींना सैनिकी शिक्षणाची दारे खुली झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली असता या शाळेचे कौतुक केले आहे.
भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे सुविधा
सैनिक विद्यालयाच्या निरीक्षण कक्षातून संपूर्ण कॅम्पस बघता येतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळे उभारले जात आहेत. कारगिल युद्ध, भारताचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट सभागृहात दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर आदी सर्व लढाऊ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. सैनिक शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत चंद्रपुरातील गोंड किल्ल्याप्रमाणे तर मैदान आॅलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टँक आणि सर्व सोईसुविधा भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे सज्ज आहेत.