७५ वर्षीय धावपटू माणिक जुनघरे

By Admin | Updated: June 13, 2015 01:34 IST2015-06-13T01:34:48+5:302015-06-13T01:34:48+5:30

मनुष्याच्या अंगी जिद्द, चिकाटी व प्रयत्नात सातत्य असले की तो विक्रमाची नोंद करतोच. याला मग वयाचेही बंधन अडसर ठरत नाही.

75 year old runner Manik Junghere | ७५ वर्षीय धावपटू माणिक जुनघरे

७५ वर्षीय धावपटू माणिक जुनघरे

अनेक विक्रम नोंदविले : शरीरयष्टी जोपासण्याकडे अधिक लक्ष
वेदांत मेहरकुळे  गोंडपिपरी
मनुष्याच्या अंगी जिद्द, चिकाटी व प्रयत्नात सातत्य असले की तो विक्रमाची नोंद करतोच. याला मग वयाचेही बंधन अडसर ठरत नाही. गोंडपिंपरी शहरात वास्तव्यास आलेल्या ७५ वर्षीय माणिक जुनघरे यांच्याकडे बघितले की याचाच प्रत्यय येतो. माणिक जुनघरे यांनी धावण्यांच्या स्पर्धामध्ये भाग अनेक विक्रम नोंदविले आहेत. आता या वयातही ते अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तरुणांना गुडघे टेकण्यास भाग पाडत आहे. विविध राज्यांमध्ये आयोजित स्पर्धेत भाग घेऊन विक्रम प्रस्थापित करीत शहरात ‘मिल्खासिंग’ असा बहुमानही त्यांनी मिळविला आहे. त्यांना उत्कृष्ट धावपटू म्हणून अनेकदा सन्मानितही करण्यात आले आहे.
७५ वर्षीय माणिक जुनघरे यांचा जन्म १ डिसेंबर १९४० साली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या पोटी या गावी झाला. जन्मगावी चवथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. यानंतर शिक्षणाचे मोहरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या जि.एस. कॉलेज वर्धा येथे त्यांनीे एम.कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून आपले सेवाकार्य सुरू केले. त्यावेळी वर्धा शहरात विविध खेळ व स्पर्धाचे आयोजन करण्यात येत होते. अशा परिस्थितीत काहीतरी वेगळे करण्याच्या दृष्टीकोनातून माणिक जुनघरे यांनी शरिरयष्टी जोपासण्याकडे लक्ष दिले. त्यानंतर धावपटू म्हणून विक्रम प्रस्थापित करण्याचा दृढ संकल्प केला.
सन १९९३ ते १९९८ अशी पाच वर्षे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावतीचे ते सदस्य राहिले. सन १९९२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या तालुका स्तरावरील आयोजित धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. १९९२ ते २००८ पर्यंत जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धामध्येही दरवर्षी पहिला व दुसरा क्रमांक ते पटकावित राहिले.
माणिकरावांची विक्रमांची भुक इथेच शमली नाही. फेब्रुवारी २००९ मध्ये उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रीय स्तरावरील इंडियन मास्टर अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेमध्ये १० किलोमीटर दौड स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. तसेच २०१२ मध्ये कर्नाटक राज्यातील बैंगलोर, सन २०१४ मध्ये तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर व २९ एप्रिल २०१५ रोजी गोवा राज्याची राजधानी पणजी येथील १० कि.मी. दौड स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले.
राज्यस्तरावरील नागपूर, अंबरनाथ, यवतमाळ, धुळे या ठिकाणी ७० ते ७५ वयोगटाच्या अनुक्रमे १० व ५ कि.मी अंतराच्या दौड स्पर्धेत सतत प्रथम पटकाविण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला आहे.
माणिक जुनघरे हे सन १९९९ ला दत्तराम भारती हायस्कूल आर्णी जि. यवतमाळ येथून मुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्त झाले आहे. गोंडपिंपरी येथे त्यांची मुलगी वास्तव्यास आहे. तिच्याकडे ते नेहमी येत असतात. दररोज सायंकाळच्या सुमारास गोंडपिंंपरीहून १० कि.मी. अंतर धावण्याचा त्यांचा सराव सुरूच असतो. त्यांना गोंडपिपरीकरांनी आवडीने ‘मिख्या सिंग’ ही पदवी दिली आहे. ते धावायला लागले की तरुणही दम टाकतात.

Web Title: 75 year old runner Manik Junghere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.