काँग्रेसच्या काळात ७० टक्के थकीत रकमेचे वाटप
By Admin | Updated: April 20, 2017 01:32 IST2017-04-20T01:32:14+5:302017-04-20T01:32:14+5:30
येथील नगर पालिकेत काँग्रेस सत्तेत असताना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची देयक रक्कम टप्प्याटप्प्याने दिल्या गेली आहे.

काँग्रेसच्या काळात ७० टक्के थकीत रकमेचे वाटप
बल्लारपूर पालिकेत श्रेयाची लढाई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम
बल्लारपूर : येथील नगर पालिकेत काँग्रेस सत्तेत असताना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची देयक रक्कम टप्प्याटप्प्याने दिल्या गेली आहे. मागील पाच वर्षात पाच कोटी रुपये म्हणजे ७० टक्के रक्कम देण्यात आली आहे, असे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे.
सद्या बल्लारपूर नगरपाकिलेवर भाजपाची सत्ता असून या नगर पालिकेतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासून उपदान, रजा, रोखीकरण, अंश राशी, जीपीएफ आणि पाचवे आणि सातवे वेतन आयोग इत्यादी बाबतची थकीत रक्कम १४ एप्रिलला संपूर्णपणे देण्यात आली.
या थकीत निधी वाटपाला नगर पालिकेने ‘ऋणमुक्त सोहळा’ असे नाव दिले. या प्रकारातून सर्व थकबाकी भाजपा प्रशासन काळातच अदा झाली. काँग्रेस प्रशासनाने काहीच केले नाही, असा चुकीचा संदेश जातो, तसे होवू नये याकरिता या नगर पालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते देवेंद्र आर्य यांनी न.प. प्रशासनात काँग्रेसच्या कार्यकाळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची दिलेली रक्कम याचा हिशोब प्रसिद्धी पत्रकातून मांडला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार २०११ ते २०१६ या कार्यकाळात नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी आणि छाया मडावी यांच्या कार्यकाळात १२५ कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. रजनी मुलचंदानी यांनी आपल्या कार्यकाळात एक कोटी ७० लाख ३९ हजार ९४ तर छाया मडावी यांच्या कार्यकाळात तीन कोटी १९ लाख २५ हजार ९७६ रुपये असे एकूण पाच कोटी रुपये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे नगर पालिकेचे वनविकास महामंडळावर मालमत्ता करापोटी गेल्या २४ वर्षापासून असलेली थकबाकी मिळविण्याचा टोकाचा प्रयत्न मुख्याधिकारी विपीन मुद्धा आणि नगराध्यक्ष छाया मडावी यांनी चालविला होता, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. यावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये या विषयावर श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या सर्व बाबींची माहिती असल्याने कोणी काय केले, याची जाण आहे. (तालुका प्रतिनिधी)