दुर्गम भागातील ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास
By Admin | Updated: February 15, 2016 01:01 IST2016-02-15T01:01:34+5:302016-02-15T01:01:34+5:30
कोरपना, जिवतीसारख्या दुर्गम भागातील ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाच्या त्रासाहन विविध व्याधींनी ग्रासले आहे.

दुर्गम भागातील ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास
विविध व्याधी : कमकुवत आरोग्य सेवेचा परिणाम
चंद्रपूर: कोरपना, जिवतीसारख्या दुर्गम भागातील ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाच्या त्रासाहन विविध व्याधींनी ग्रासले आहे. एका स्वयंसेवी संस्थेने जिवती तालुक्यातील आंबेझरी या दुर्गम आदिवासी गावात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरादरम्यान, ही बाब उजेडात आली आहे. या भागात असलेली कमकुवत आरोग्य सेवाच याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील आरोग्याच्या सेवेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र ही सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नसल्याचे यातून सिद्ध झाले आहे. चंद्रपुरातील मनोरमा हेल्थकेअर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने जिवती तालुक्यातील आंबेझरी या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील ३५० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यात ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा आजार जडल्याची बाब समोर आहे. सोबतच ९० टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचे आजार जडल्याचे तपासणीत दिसून आले, अशी माहिती डॉ.वैभव पोडचलवार यांनी दिली.
जीवती हा अतिशय दुर्गम आणि आदिवासीबहुल तालुका आहे. या तालुक्यात अनेक समस्यांसह आरोग्य सेवेचाही अभाव आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी अभावानेच दिसून येतात. येथे कार्यरत कर्मचारी तालुका अथवा जिल्हास्थळावरून ये-जा करतात. अनेकदा येतही नाहीत. त्यामुळे आजारी रुग्णांचे हाल होतात. त्यातच या भागातील नागरिकांमध्ये अज्ञानही आहे. अवैज्ञानिक उपचारांवर त्यांचा अधिक भर असतो. लहान-सहान आजार ते अंगावरच काढतात. त्यातून हे आजार गंभीर स्वरूप धारण करतात. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)