७० गावकऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

By Admin | Updated: September 11, 2015 01:24 IST2015-09-11T01:24:01+5:302015-09-11T01:24:01+5:30

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाविरूद्ध नारेबाजी करीत ...

70 cases filed against villagers | ७० गावकऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

७० गावकऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

वासेरा ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद : जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाविरूद्ध नारेबाजी करीत गोंधळ घातल्याने या निवडणुकीला चांगलेच गालबोट लागले. याप्रकरणी ७० जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या वासेरा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. यावेळी निवडून आलेल्या दोन्ही गटांकडून सरपंच व उपसरपंचपद काबिज करण्यासाठी बरीच रस्सीखेच सुरू झाली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांच्या समर्थनार्थ शेकडो नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर चालून गेले. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. वरिष्ठांनी त्वरित चंद्रपुरातून दंगा नियंत्रण पथक वासेरा येथे पाठविले. दंगा नियंत्रण पथक दाखल होऊनही नागरिक जुमानत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे पळापळ सुरू झाली. दरम्यान, नागरिकांनी पोलीस व प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी करून जमावबंदीचे उल्लंघन केले.
निवडणुकीदरम्यान गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीस व प्रशासनाविरूद्ध नारेबाजी व घोषणा देत शिवीगाळ करणे व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे पोलीस प्रशासनाने संदीप बोरकर, वामन बोरकर, अशोक बोरकर, पिंटू बन्सोड, चंदू बोरकर, लोकनाथ बोरकर, किशोर बन्सोड, कैलास बोरकर, महादेव बोरकर, मुरलीधर बोरकर, किशोर बोरकर, विष्णू बोरकर, श्यामराव आत्राम, महेश बोरकर, धनराज बोरकर, जितेंद्र मेडीवार, संजय बोरकर या २० प्रमुख नागरिकांसह एकुण ७० जणांविरूद्ध कलम १४३, १४७, ३२३, १८६, १८८ भादंवि १३५, मु.पो.का. अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
वासेरा येथे मंगळवारपासून तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक मंगळवारी झाली असली तरी बुधवारीही गावात संचारबंदीसारखी परिस्थिती होती. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, या प्रकारानंतर गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 70 cases filed against villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.