वर्षभरात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; १३ जणांच्या कुटुंबीयांना मदतही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:43+5:302021-03-19T04:26:43+5:30
राजेश मडावी चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने स्वत:सह पती व चार मुलांसह ...

वर्षभरात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; १३ जणांच्या कुटुंबीयांना मदतही नाही!
राजेश मडावी
चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने स्वत:सह पती व चार मुलांसह दत्तपुरातील (वर्धा) मनोहर कुष्ठधामात एन्ड्रीन मिसळलेले भजे खाऊन १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्याची ही पहिली अधिकृत आत्महत्या! या घटनेला शुक्रवारी ३५ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, आत्महत्यांचे दुष्टचक्र अद्याप संपले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद का संपत आहे, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही २०२० मध्ये ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. १३ जणांच्या कुटुंबीयांना तर अद्याप मदतही मिळाली नाही.
शेतीची मशागत, पेरणी, कापणी, बियाणे, खते व कीटकनाशके विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागतात. घर चालवताना जीव मेटाकुटीला येतो. शेतीचा खर्च वाढल्याने हाती काहीच पैसे उरत नाहीत. त्यामुळे कर्ज घ्यावे लागते. त्यातही बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येतात. बऱ्याच शेतकऱ्यांकडे तारण शक्तीही नसते. आधीच्याच थकीत कर्जाने शेतकरी हैराण असतात. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता खचून जातो. तुटपुंज्या उत्पन्नामुळे शेतकरी कर्जाची परतपेड करू शकत नाही. कुटुंबाला जगण्यासाठीही पैसे लागतात. मुलांचे शिक्षण व लग्नासाठी पैसे हवेत. वरून कर्ज भरण्याचा तगादा, अशा अनेक कारणांमुळे शेतकºयांची उमेद खचते. सरकारच्या चुकीच्या आर्थिक व कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांना या नैराश्यातून मार्ग काढण्याचे पर्याय उपलब्ध होत नाही. यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दैनावस्था
चंद्रपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४० प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले. २०२० मध्ये ६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. जिल्हा समितीने केवळ २५ प्रकरणे अपात्र ठरविले. एका प्रकरणाची फेरचौकशी चौकशी सुरू आहे तर १२ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दैनावस्था सुरू आहे.