६०२ नागरिकांना साथरोगांचा विळखा

By Admin | Updated: December 26, 2015 01:11 IST2015-12-26T01:11:16+5:302015-12-26T01:11:16+5:30

ग्रामीण जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजही अनेक ग्रामपंचायती स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

602 Civic Agents | ६०२ नागरिकांना साथरोगांचा विळखा

६०२ नागरिकांना साथरोगांचा विळखा

तिघांचा मृत्यू : चौकशी झाली मात्र कारवाई कुणावरच नाही
मंगेश भांडेकर चंद्रपूर
ग्रामीण जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजही अनेक ग्रामपंचायती स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून २०१५ या वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल ६०२ नागरिकांना साथरोगाने ग्रासले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी झाली. मात्र कारवाई कुणावरही न झाल्याने दोषी कोण, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
वर्षभरात साथरोग उद्भवल्याच्या जिल्ह्यात ९ घटना घडल्या. यात तब्बल ६०२ नागरिकांना लागण झाली आणि तिघांचा मृृत्यू झाला. साथरोग उद्भवण्याला कारणे काय, दोषी कोण, याबाबत जिल्हास्तरीय अधिकारी व चौकशी पथकाने गावाला भेट देऊन चौकशी केली. मात्र या चौकशीत एकाही ठिकाणी कुणीच दोषी आढळले नाही. मग साथरोग उद्भण्याची कारणे शोधली असता, विहिरीचे दूषित पाणी, हातपंपाचे दूषित पाणी, डास घनतेत वाढ, परिसर अस्वच्छता अशी कारणे उजेडात आली. मात्र ही कारणे असण्याला जबाबदार कोण, हे मात्र तपासण्यातच आले नाही.
शासन नागरिकांच्या आरोग्यावर जातीने लक्ष देऊन गावागावात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही यावर उपाय सुरू आहेत. मात्र संबधीत गावातील ग्रामपंचायत प्रशासन व तेथील कार्यरत अधिकारी यांचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या उद्भवत आहेत.
मात्र चौकशी अधिकारी यात कुणाचाही दोष नाही, असा शेरा देऊन दोषींना पाठीशी घालतात. गावातील जलस्त्रोत व स्वच्छतेकडे लक्ष देणे हे त्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासह कार्यरत प्रशासकीय अधिकाऱ्याचेही तेवढेच आहे. मग दोषी कुणीच कसे नाही, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.
साथरोग रूग्णसंख्येत एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत अचानक वाढ झाल्यास साथरोग उद्रेक म्हटले जाते. यात दैनंदिन रुग्णांमध्ये प्रामुख्याने ताप, अतिसार, खोकला इत्यादी लक्षणांचे रूग्ण जास्त प्रमाणात असतात. जलजन्य आजारांचे दैनंदिन स्वरुपातील संनियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य साथरोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत केले जाते. मात्र या कार्यक्रमाची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने आजार बळावले आहे.

अतिसार, व्हायरल फिव्हर, डेंग्युचाही उद्रेक
वर्षभरात अतिसार आजाराची १५० रूग्णांना लागण झाली. यात पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलबाधा येथे ३३ व सावली तालुक्यातील पेंढरी येथे ११७ नागरिकांना अतिसारची लागण झाली. तर किटाळी येथे ४६ जणांना व्हायरल फिवर व ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदगाव येथे १३ जुलैला ७० जणांना तर मुल तालुक्यातील उश्राळा येथे २७ जुलैला १४८ जणांना डेंग्यु आजाराने ग्रासले होते.

हिवतापाने दोघांचा गेला जीव

१८ फेब्रुवारी २०१५ ला पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी नं. २ येथे हिवतापाचा उद्रेक झाला होता. यात ५१ नागरिकांना हिवतापाने ग्रासले. यातील एकाचा मृत्यू झाला. तर १४ आॅगस्टला चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे ८८ नागरिकांना लागण झाली. येथेही एकाचा मृत्यू झाला.

गॅस्ट्रोची ४४ जणांना लागण
११ एप्रिलला चंद्रपूर तालुक्यातील कारवा येथील आश्रमशाळेच्या ६ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू गॅस्ट्रो आजारामुळेच झाला, हे निश्चीत झाले नाही. तर अमरपुरी येथेही १ सप्टेंबरला ३८ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली.

Web Title: 602 Civic Agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.