राजस्व अभियानात वर्षभरात ६० हजार दाखल्यांचे वाटप
By Admin | Updated: July 3, 2014 23:30 IST2014-07-03T23:30:21+5:302014-07-03T23:30:21+5:30
सुवर्ण राजस्व अभियानात जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३३४ गावातील शाळामध्ये शिबिर आयोजित करुन विविध प्रकारच्या ५९ हजार ४७७ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

राजस्व अभियानात वर्षभरात ६० हजार दाखल्यांचे वाटप
मुलींना प्रशिक्षण : १,७३६ गाव नमुने अद्यावत
चंद्रपूर : सुवर्ण राजस्व अभियानात जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३३४ गावातील शाळामध्ये शिबिर आयोजित करुन विविध प्रकारच्या ५९ हजार ४७७ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे वर्ग ८ ते १० च्या हजारो विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव कार्यक्रम राबविण्यात आला.
महसूल विभाग लोकाभिमुख व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरु केले. या अभियानात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैविधपूर्ण काम झाले असून जिल्ह्यातील ३३४ शाळांमध्ये शिबिर आयोजित करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी लागणारे विविध प्रकारचे ५९ हजार ४७७ दाखले वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या निरनिराळ्या समस्या निकाली काढण्यासाठी १६०२ गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या दरम्यान ३९७१ खातेदार मृत असल्याचे निदर्शनास आल्यावरुन त्यांच्या वारसाच्या नोंदी घेण्यात आल्या.
ग्रामीण भागात शिक्षणाकरिता गावापासून दूर जाणाऱ्या ८ ते १० वीच्या विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याचा अभिनव कार्यक्रम राजस्व अभियानांत घेण्यात आला. यामध्ये ६०० मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले. चांदा क्लब ग्राऊंड येथे झालेल्या कार्यक्रमात ६७८ मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीने प्रशिक्षणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यात आला.
शासकीय कामात गतिमानता यावी यासाठी जिल्ह्यातील २९९ तलाठी व ५० मंडळ अधिकारी यांच्यासाठी खासदार, आमदार व स्थानिक निधीमधून ३३ लाख रुपयांचे १२८ लॅपटाप घेण्यात आले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सातबारा देणे सुलभ होणार आहे.
तालुका मुख्यालय, महसूल मंडळ तसेच तलाठी मुख्यालय येथे फेरफार अदालत घेवून १९ हजार ४०३ फेरफार निकाली काढण्यात आले आहे. तर ई चावडी व ई अभिलेख अंतर्गत १८३६ गावापैकी १७३६ गावांचे नमूना १ ते २१ अद्यावत करण्यात आले आहे.
गाव नकाशाप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिक्रमीत ११६२ किमी लांबीचे ८०८ रस्त्यापैकी ४२७ रस्त्यावरील ५३१ किमी लांबीचे अतिक्रमण हटविण्याचे काम या अभियानात करण्यात आले. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी १९८ स्वंयसहायता गटामार्फत १५ तालुक्याकरिता २०२० प्रशिक्षणार्थ्यांना कागदी व कापडी बॅग बनविण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.
सिकलसेल कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ११९ शिबिरे आयोजित करुन ३ लाख १७ हजार लोकांना सिकलसेलविषयी माहिती देण्यात आली. जिल्ह्यात सिकलसेल कार्यक्रम सुरु झाल्यापासून मे २०१४ पर्यंत ८ लाख ९४ हजार व्यक्तींची तपासणी झाली असून त्यामध्ये १९१५ व्यक्ती सिकलसेल रोगी तर १८ हजार ८०० व्यक्ती सिकलसेल वाहक आहेत. त्यांनी जनजागृती करण्याची मोहिम सुरु आहे.
सुवर्ण जयंती राजस्व अभियान यावर्षीही मोठ्या प्रमाणात राबविण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्धार आहे. (शहर प्रतिनिधी)