राज्याच्या ६० बसस्थानकांवर उभारणार मिनी थिएटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 15:33 IST2019-02-13T15:32:50+5:302019-02-13T15:33:44+5:30

महाराष्ट्रातील तब्बल ६० बसस्थानकांवर राज्य शासन मिनी थिएटर्सची उभारणी करण्याच्या तयारीत आहे.

60 Mini Theaters to Build on Bus Stations in the State | राज्याच्या ६० बसस्थानकांवर उभारणार मिनी थिएटर्स

राज्याच्या ६० बसस्थानकांवर उभारणार मिनी थिएटर्स

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रातील तब्बल ६० बसस्थानकांवर राज्य शासन मिनी थिएटर्सची उभारणी करण्याच्या तयारीत आहे. ही थिएटर्स विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच महाराष्ट्राच्या प्रगतीत वाटाही उचलणार आहेत. प्रवाशांनाही बसची वाट पाहताना मनोरंजनाचे साधन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बुधवारी दिली.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चा करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
चंद्रपूर येथे एमडीआर मॉल अ‍ॅन्ड मिराज सिनेमाचे उद्घाटन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
सबंध महाराष्ट्रामध्ये साडे सहाशेवर बसस्थानके आहेत. यापैकी काही बसस्थानकांमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काहींची नवीन बांधकामेही सुरू आहे. या अनुषंगाने बसस्थानकावर मिनी थिएटरची संकल्पना पुढे आली. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चेअंती हा निर्णय केला आहे. राज्यातील ६० बसस्थानकांवर मिनी थियेटर्स बनविण्यात येणार आहेत. या माध्यमातून त्या बसस्थानकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातून या थिएटरमध्ये मार्गदर्शन घेता येईल, अशी माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.
एकाच जागेवरून या सर्व थिएटरमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान देताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येईल. यासोबतच विविध मनोरंजनाच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या बसची वाट पाहणाऱ्यांना एक त्या थिएटरचा उपयोग घेता येईल. असा दृष्टीकोन त्यामागे ६० थिएटरचा आहे. या साठही थिएटरमध्ये एकाचवेळी सारखी माहिती व मनोरंजन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मिराज सिनेमाचे सर्वेसर्वा दिनेश चोरडिया, महेंद्र मंडलेचा यांच्यासह शहरातील गणमान्य मंडळींची उपस्थिती होती.

Web Title: 60 Mini Theaters to Build on Bus Stations in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.