६ हजार ६६१ मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:10+5:302021-07-07T04:35:10+5:30
चंद्रपूर : लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांनी आपली नावे व छायाचित्र अपडेट करणे ...

६ हजार ६६१ मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार!
चंद्रपूर : लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांनी आपली नावे व छायाचित्र अपडेट करणे गरजेचे असते. आयोगाकडून मतदार यादी तपासणी मोहीम राबविली जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून छायाचित्र सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ६६१ मतदारांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविले की नाही, याबाबत निवडणूक आयोगाकडून तपासणी केली जाते. दरवेळी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत केल्या जातात. संबंधित मतदाराने विहित कालावधीत पुरावे सादर केले नाहीत, तर मतदार यादीतून नाव कमी केले जाते. त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार यादीत नाव तपासून पाहणे हे त्याचे आद्य कर्तव्य ठरते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अपडेट करण्याचे काम जिल्ह्यात सुरू केले. मतदार यादीतील नावासोबतच आता छायाचित्र असणे अनिवार्य केले आहे. जर नाव या यादीत नसेल, तर फॉर्म सहा भरल्यास ही प्रक्रिया पूर्ण होते. पण, आता छायाचित्रही आवश्यक आहे.
असे होता येते मतदार...
१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा मतदान करणार असाल, तर फॉर्म ६ भरावा लागतो. मतदारसंघ बदलण्यासाठी याच क्रमांकाचा अर्ज ग्राह्य धरला जातो. या फॉर्मसोबत तीन पुरावे आवश्यक, रंगीत छायाचित्र, वयाचा पुरावा, पत्ता असलेला पुरावा उदा. रेशन कार्ड, टेलिफोन, वीज बिल, पासपोर्ट, लायसन्स किंवा आधारकार्डही मान्य केले जाते. मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करता येते. फॉर्म ६ ऑनलाइन भरता येतो. त्याच ठिकाणी आपल्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करता येतात. सबमिट केल्यानंतर संबंधित मतदारसंघाच्या यादीत नाव समाविष्ट होते.
मतदार यादीत नाव दुरुस्ती
मतदार यादीत चुकीचे नाव असेल, तर फॉर्म ८ भरून रजिस्ट्रेशन करता येतो. जर पत्ता बदलला, दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यास तिथे नाव नोंदविण्यासाठी फॉर्म ६ भरावा लागतो. ज्या ठिकाणी तुम्ही राहता, त्याच मतदार क्षेत्रात नाव नोंदणी करा. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार नोंदणी करता येत नाही. कुणाच्या नावावर तुमची हरकत असेल, तर फॉर्म ७ भरावा लागतो.
मतदार यादीत छायाचित्र अनिवार्य
मतदान ओळखपत्र हरविल्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे २५ रुपये भरून आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची पोहोचपावती जोडून अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर नवीन ओळखपत्र दिले जाते. व्होटर आयडी दोन महिन्यांच्या आत मिळते. त्यामुळे निवडणुकीच्या दोन महिने आधी ही आयडी मिळण्यासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. व्होटर आयडी नाही, मात्र नाव मतदार यादीत असल्यास तुमच्या पोलिंग बुथवर मतदान करू शकता. पण, यापुढे छायाचित्र अनिवार्य करण्यात आले आहे.
विधानसभानिहाय मतदार...
राजुरा - ३१२५९७
चंद्रपूर - ३८९०१३
बल्लारपूर - ३१४६०९
वरोरा - २८८१४०
चिमूर - २७२२५०