५९ जणांना जेलची हवा
By Admin | Updated: March 8, 2015 00:33 IST2015-03-08T00:33:02+5:302015-03-08T00:33:02+5:30
होळीनिमित्त जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्यानंतरही अनेकांनी वाहतुकीची नियम तोडले. एवढेच नाही तर, काहींनी मनसोक्त मद्यप्राशन करून होळी साजरी केली.

५९ जणांना जेलची हवा
चंद्रपूर: होळीनिमित्त जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्यानंतरही अनेकांनी वाहतुकीची नियम तोडले. एवढेच नाही तर, काहींनी मनसोक्त मद्यप्राशन करून होळी साजरी केली. अशा ४२ मद्यपी तसेच १७ दारुविक्रेत्यांना पोलिसांनी जेलची हवा दाखविली. तर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ८४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलिसी हिसक्यामुळे अनेकांनी अवैधमार्गाने दारुची विक्री टाळली. १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने काहींनी होळीपासून दारु न पिण्याचा संकल्प केला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात आली. काहींनी शहराबाहेर तर काहींनी मित्रमैत्रिनींसोबत हा सण साजरा केला. मागील वर्षी होळीच्या दिवशी अवैध मार्गाने मिळणारी दारू आणि भांडणामुळे अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. एवढेच नाही विविध अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. यात काहींना आपला जीव गमवावा लागला. अशा घटना जिल्ह्यात घडू नये यासाठी यावर्षी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी विशेष काळजी घेत सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. एवढेच नाही तर प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना शासकीय वाहन उपलब्ध करून देत चोख बंदोबस्त ठेवला. याचा चांगला परिणाम यावर्षी दिसून आला असून अपघात विरहीत होळी साजरी झाली.
६ मार्चला दिवसभर पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर १७ जण अवैध मार्गाने दारू विकताना आढळून आले. या सर्वांना कोठडीत ठेवण्यात आले. तर दुचाकीवर ट्रीपलसिट नेणाऱ्या ८४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. यामध्ये ९ महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना पोलीस ठाण्यात दोन तास बसवून ठेवण्यात आले. (नगर प्रतिनिधी)