५८ दिवसांच्या आंदोलनाची फलश्रुती

By Admin | Updated: March 10, 2016 01:15 IST2016-03-10T01:15:55+5:302016-03-10T01:15:55+5:30

वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी....

58 day agitation agitation | ५८ दिवसांच्या आंदोलनाची फलश्रुती

५८ दिवसांच्या आंदोलनाची फलश्रुती

विद्यार्थी जिंकले : राज्यभरातून आलेले विद्यार्थी स्वगावी रवाना
चंद्रपूर : वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चंद्रपुरात येऊन आंदोलन छेडले. सलग ५० दिवस साखळी उपोषण व त्यानंतर आमरण उपोषण केले. यादरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृतीही खालावली. तरीही विद्यार्थी मागे हटले नाही. अखेर उपोषणाच्या आठव्या दिवशी शासनाने त्यांना ठोस आश्वासन देऊन शासन निर्णयासाठी अवधी मागितल्यानंतर आंदोलन आज बुधवारी मागे घेण्यात आले. मागील ५८ दिवसांपासून निश्चल उभा असलेला त्यांचा उपोषण मंडप आज काढण्यात आला आणि राज्यभरातून आलेले हे आंदोलक विद्यार्थी आपापल्या गावी रवाना झाले.
राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि डॉ. बा.सा.को. कृषी विद्यापीठ दापोली या दोन विद्यापिठांतर्गत प्रत्येकी एक असे एकूण दोन वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालये आहेत. यातील प्रत्येक महाविद्यालयावर महाराष्ट्र शासनाचा दोन कोटी रुपयांचा खर्च होतो. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय वानिकी अनुसंधान व शिक्षा परिषद देहरादून यांचेही वित्तीय सहाय्य महाविद्यालयांना मिळते. वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये ४९ वनासंबंधित विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. एवढेच नाही तर वनविभागद्वारे वनकार्यानुभव (सहा महिने) आणि वनशास्त्र महाविद्यालयाद्वारे वनव्यवसायिक प्रशिक्षण (सहा महिने) दिले जाते. असे असतानाही वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी या पदाच्या भरतीमध्ये केवळ पाच टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे शासनाचा एवढा खर्च होऊन तयार झालेल्या विद्यार्थ्यांना बेरोजगार रहावे लागते.
परिणामी या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना संबंधित पदभरतीत १०० टक्के जागा आरक्षित करून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती करावी, अशी मागणी करीत राज्यभरातील पदवीधारक विद्यार्थ्यांनी वनमंत्र्यांच्या चंद्रपूर शहरात आंदोलन उभे केले. १२ जानेवारीपासून येथील मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील परिसरात त्यांनी साखळी उपोषण सुरू केले. आंदोलनाची दखल घेतली जाईल, अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही आणि साखळी उपोषण वाढत गेले. तब्बल ५० दिवस हे आंदोलन सुरूच होते. साखळी उपोषणाचे ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही शासन दखल घेत न नसल्याने या विद्यार्थ्यांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ मार्चपासून रोहित लांबे, नागेश डोंगरे, अक्षय पवार, महेश काकडे, हरीश गजभिये, पंकज लोनकर आणि सद्दाम हुसेन संदे हे आठ विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले. दरम्यान, पाचव्या दिवशी चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. सद्दाम हुसेन संदे या विद्यार्थ्याला तर दवाखान्यात दाखल करण्यात आले. आज बुधवारी आमरण उपोषणाचा आठवा दिवस होता. आंदोलन चिघळत जाण्याचे चिन्ह दिसू लागले होते. दरम्यान, शासनाने आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मागितला. त्यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. आज तहसीलदार गणेश शिंदे व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 58 day agitation agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.