कत्तलखान्यात जाणाऱ्या ५५ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:56 IST2019-03-17T22:55:56+5:302019-03-17T22:56:15+5:30
कंटेनरमधून जनावर कोंबून नेत असताना सिनेस्टाईल पाठलाग करून कोरपना पोलिसांनी कतलीसाठी नेत असलेल्या जनावराची सुटका करून आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

कत्तलखान्यात जाणाऱ्या ५५ जनावरांची सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : कंटेनरमधून जनावर कोंबून नेत असताना सिनेस्टाईल पाठलाग करून कोरपना पोलिसांनी कतलीसाठी नेत असलेल्या जनावराची सुटका करून आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कंटेनरमधून (क्र. एमएच ३४ बीजी ८९७७ ) जनावरे तस्करी होत असल्याची शंका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालणाऱ्या पथकाला आली. पोलिसांनी सदर कंटेनरचा पाठलाग केला. मात्र कंटेनर थांबले नाही. दरम्यान, राज्य सीमा सुरक्षा तपासणी नाका येथे बॅरिकेट्स लावण्यास भरारी पथक प्रमुख व कोरपन्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप यांनी सीमेवर तैनात ए. एस. आय. दुबे व पथकाला सांगितले. त्यांनी बॅरिकेट्स लावले. मात्र तस्करांचे वाहन थांबले नाही. या वाहनाने तीनही बॅरिके्टस उडवून दिले. मात्र यातील एक बॅरिकेट कंटेनरला अडकल्याने कंटेनर थांबला. या दरम्यान पाठलाग करीत असलेल्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र यातील तीन आरोपी फरार होण्यास यशवी झाले.
त्यांचा शोध सुरू आहे. कंटेनरमध्ये ६० जनावरे आढळून आली. त्यांची सुटका करण्यात आली. जनावरे किंमत सहा लाख व कंटेनर किंमत १२ लाख असा एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, यातील पाच जनावरे मृतावस्थेत आढळली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप यांच्या नेतृ्त्वात पोलीस कर्मचारी बन्सीलाल कुडावले, सुनील गेडाम, गजानन चारोळे आदींनी केली.