लोकसहभागातून ५४४ कामे झाली पूर्ण
By Admin | Updated: September 3, 2016 00:39 IST2016-09-03T00:39:23+5:302016-09-03T00:39:23+5:30
जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे.

लोकसहभागातून ५४४ कामे झाली पूर्ण
जलयुक्त शिवार : लोकसहभागातून काढला ४.४६ लक्ष घनमीटर गाळ
चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे. समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा या अभियानात सक्रीय सहभाग लाभत आहे. जिल्ह्यातही अभियानास चांगला प्रतिसाद लाभत असून त्यामुळेच केवळ एका वर्षात लोकसहभागातून तब्बल ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, शेततळ्यातून काढण्यात आला आहे.
जनकल्याणकारी कुठलेही अभियान किंवा योजना ही लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. लोकांना सदर अभियान आपले वाटले तरच ते यशस्वी होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. लोकांचा सहभाग लाभलेल्या योजना यशस्वी झाल्याची अलिकडच्या काळातील अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियान राबविताना लोकसहभागावर भर देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात करोडो रुपए किंमतीची हजारो कामे अभियानांतर्गत लोकसहभागातून झाली आहे. या चळवळीत जिल्ह्यानेही आपला भरीव लोकसहभागाचा वाटा दिला आहे.
पहिल्या वषार्साठी जिल्ह्यातील २१८ गावे अभियानासाठी निवडण्यात आली होती. या गावांमध्ये ठिकठिकाणी काही कामे लोकसहभागातून करण्यात आली. लोकसहभागातून करण्यात आलेल्या या कामांची संख्या तब्बल ५४४ इतकी आहे. विशेष म्हणजे या कामातून ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, नाले, शेततळे यातून काढण्यात आला आहे. तलाव, नाला, बंधाऱ्यात गाळ साचल्याने, त्यात पाणीसाठा अल्प प्रमाणात होतो. पाणी संचय क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे फार महत्वाचे असते. त्यामुळे या कामासाठी लोकसहभाग घेतल्याने ही कामे होऊ शकली.
लोकसहभागातून केलेल्या या कामांवर अत्यावश्यक बाबीसाठी शासनाच्यावतीने दोन कोटी रुपए खर्च करण्यात आले आहे. खाजगी किंवा शासन नियंत्रणातील कंपन्यांना आपल्या सामाजिक दायित्वांतर्गत उत्पन्नातील काही रक्कम लोकहितोपयोगी कामांवर खर्च करावी लागते. त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सामाजिक निधीतून जलयुक्त शिवार अभियानाची १९ कामे पूर्ण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या निधीतून १ लक्ष ८४ हजार घनमिटर गाळ काढण्यात आला असून सामाजिक दायित्व निधीतून २४ लक्ष खर्च झाले. (स्थानिक प्रतिनिधी)