५०० शिक्षकांच्या बदल्या अडकल्या
By Admin | Updated: June 19, 2017 00:46 IST2017-06-19T00:46:25+5:302017-06-19T00:46:25+5:30
या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या ४९ प्राथमिक शिक्षकांची पहिली बदली यादी आॅनलाईनवर आली आहे.

५०० शिक्षकांच्या बदल्या अडकल्या
मिलिंद कीर्ती । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या ४९ प्राथमिक शिक्षकांची पहिली बदली यादी आॅनलाईनवर आली आहे. मात्र, इतर जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या ५०० शिक्षकांच्या बदल्या ‘रोस्टर’मध्ये अडकल्या आहेत. गेल्या १९ वर्षांपासून जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली (रोस्टर) तपासणी केली नसल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी रोस्टरमध्ये घोळ घालून ठेवला आहे. त्याचा फटका या शिक्षकांना बसला आहे. रोस्टरमध्ये अनेक चुका असल्याने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली फाईल शिक्षण विभागाकडे परत पाठविली आहे.
बदल्यांच्या संदर्भात २४ एप्रिल २०१७ रोजीच्या शासकीय आदेशामध्ये म्हटले आहे की, ज्या जिल्हा परिषदेने मागासवर्ग कक्षाकडून बिंदूनामावली तपासणी केली असेल, त्याच जिल्हा परिषदांच्या बदल्या करण्यात येतील. ज्या जिल्हा परिषद बिंदू नामावली तपासणी करण्यात अपयशी ठरल्या असतील, तेथे बदल्या करता येणार नाहीत. मात्र, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांची बिंदूनामावली व्यवस्थित तयार केलेली नाही. बिंदूनामावलीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमाव, भज, विमुक्त, विशेष मागास वर्ग आदी विविध प्रवर्गातील आरक्षण तयार करून त्यानुसार, पदभरती करणे आवश्यक आहे. याकडे शिक्षकांच्या नियुक्ती करताना प्रचंड दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून बिंदूनामावलीमध्ये घोळ घालण्यात आला आहे.
सध्या इतर कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत आहे. त्याकरिता बिंदनामावली दुरूस्ती करणे सुरू आहे. शिक्षण विभागाने बिंदूनामावली तयार करून शिक्षकांची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविली होती. परंतु या बिंदूनामावलीमध्ये प्रचंड घोळ घालण्यात आल्याचे निदर्शनास आले. चुका आढळल्याने ती फाईल परत पाठविण्यात आली. बिंदूनामावली दुरुस्त करण्यात आली आहे. अंतिम बिंदूनामावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बिंदूनामावलीला मागासवर्ग कक्षाची मंजुरी मिळाल्याशिवाय इतर जिल्ह्यातून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार नाहीत. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर यांच्याशीही संपर्क केला आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधूदुर्ग अशा दूरच्या जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक कार्यरत आहेत. इतर जिल्ह्याच्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आंतरजिल्हा बदलीची मागणी केली आहे.
रोस्टरवर २२ जूनपर्यंत मागविले आक्षेप
प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांची बिंदूनामावली तयार केली आहे. ती जारी करण्यात आली आहे. या बिंदूनामावलीवर शिक्षक संघटनांच्या प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. त्याकरिता २२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर बिंदूनामावलीमध्ये दुरूस्ती करून नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे पाठविण्यात येईल. या कक्षाने बिंदूनामावली तपासून दिल्यानंतर इतर जिल्ह्यातून चंद्रपुरात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
बिंदूनामावलीसाठी सहायक आयुक्तांचे पत्र
मागासवर्गीयांच्या बिंदूनामावलीबाबत नागपूर विभागीय मागास वर्ग कक्षाचे सहायक आयुक्तांनी १० जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा परिषदेला पत्र पाठविले. त्यामध्ये बिंदूनामावली तपासण्याची सूचना करण्यात आली आहे. जून महिना आला तरी शिक्षकांची बिंदूनामावली तपासण्यात आली नाही. आता नागपूर विभागीय मागासवर्ग कक्षाकडे २४ जूनपर्यंत बिंदनामावली पाठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यापूर्वीच मागासवर्ग कक्षाची बिंदूनामावलीला मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
सर्वाधिक बदल्या यवतमाळात
चंद्रपूर जिल्ह्यातून इतरत्र जाणाऱ्या ४९ शिक्षकांची पहिली यादी आॅनलाईन जारी करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास विकास विभागाने या बदल्या साखळी पद्धतीने समायोजनातून केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १० शिक्षकांच्या बदल्या यवतमाळ जिल्ह्यात केल्या आहेत. वर्धा व गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी सात शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. अमरावती पाच, भंडारा तीन, नागपूर, पुणे, नांदेड, जालना, औरंगाबाद, गडचिरोली आदींमध्ये प्रत्येकी दोन, वाशिम, ठाणे, हिंगोली, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका शिक्षकाला बदली देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावर शिक्षकांचे आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्यानंतर रोस्टर दुरूस्त करून नागपूर विभागीय मागासवर्ग कक्षाकडे पाठविण्यात येईल. या महिन्यातील शेवटीच्या आठवड्यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये इतर जिल्ह्यातून शिक्षकांना नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
-राम गारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. चंद्रपूर.
आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत. त्यात बदली झालेल्या शिक्षकांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीची छाननी करून ती मंजुरी मिळण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. आंतरजिल्हा बदल्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांनाही आपल्या स्वजिल्ह्यात बदलून येता येईल.
-जितेंद्र पापडकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प., चंद्रपूर.