४७ पेट्या देशी-विदेशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:53 IST2021-02-21T04:53:06+5:302021-02-21T04:53:06+5:30
नागपूर येथून चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोराला मिळाली. या माहितीच्या आधारावर नवतळा-पिंपळगाव ...

४७ पेट्या देशी-विदेशी दारू जप्त
नागपूर येथून चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोराला मिळाली. या माहितीच्या आधारावर नवतळा-पिंपळगाव मार्गावर पाळत ठेवली. रात्री अंदाजे अडीचच्या सुमारास संशयित वाहन येताना दिसताच वाहनाला थांबविण्याचा इशारा केला. मात्र वाहनचालकाने वाहन न थांबविता पळ काढला. परंतु, रोडचे काम चालू असल्याने वाहन चालकाने नवतळा-पिंपळगाव मार्गावरील स्मशानभूमीजवळ वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. पथकाने वाहनाजवळ जाऊन दारूबंदी कायद्याअंतर्गत वाहनाची झडती घेतली असता, देशी दारूचे ४५ बॉक्स व विदेशी दारूचे दोन बॉक्स व चारचाकी वाहन असा एकूण साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश तोंडे, सहायक दुय्यम निरीक्षक चंदन भगत, दिलदार रायपुरे, उमेश झुंबाडे, किशोर पेदूजवार, सुजित चिकाटे आदींनी केली.