४६७ कामगारांच्या आयुष्यातील ‘ते’ ३६५ दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 05:20 IST2016-04-19T05:20:16+5:302016-04-19T05:20:16+5:30
एक चांगलं आयुष्य जगण्याची आस घेवून बरांज कोळसा खाणीत नोकरीला लागलो. तांत्रिक कारणामुळे कोळसा खाण बंद झाली.

४६७ कामगारांच्या आयुष्यातील ‘ते’ ३६५ दिवस
सचिन सरपटवार ल्ल भद्रावती
एक चांगलं आयुष्य जगण्याची आस घेवून बरांज कोळसा खाणीत नोकरीला लागलो. तांत्रिक कारणामुळे कोळसा खाण बंद झाली. आमचे पगार बंद झाले. राहात असलेल्या क्वॉर्टरमधील वीज अन् पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले. पैशाची अडचण भासू लागली. उदरनिर्वाह कसा करावा, हे समजेनासे झाले. घरातील वस्तू विकाव्या लागल्या. दुध बंद केले. पोरांच्या शाळा बंद झाल्या. ठेल्यावर मुंगफल्ली विकणे सुरू केले. दारोदारी कपडे विकू लागलो. शेतमजुरीच्या कामाला जावू लागलो. गाव सोडण्याचा विचार डोक्यात येवू लागला. अनेक आंदोलने केलीत उपयोग झाला नाही. आयुष्याचाच कोळसा होतो की काय याची भिती वाटू लागली. आयुष्यात स्वप्न पाहली होती. पण आज कंपनीच्या धोरणामुळे कुठे आयुष्य गेलं, असे म्हणण्याची वेळ आली. या भावना आहेत. त्या ४६७ कामगारांच्या, ज्यांचा ३६५ पेक्षा अधिक दिवस होवूनही पगार बंद आहे. या ३६५ दिवसांत प्रत्येक दिवशी त्यांनी मरणयातना भोगल्या.
बरांज (भो) स्थित कर्नाटका एम्टाची खुली कोळसा खाण गेल्या १ एप्रिल २०१५ पासून बंद आहे. आज एक वर्षे झाले. प्रशासकीयस्तरावर बैठका झाल्या. आश्वासने दिलीत. परंतु काहीही उपयोग झाला नाही. मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली. पण त्याचे अजुनही काही फलीत निघाले नाही.
या वर्षभरात आपल्या न्याय मागण्यासाठी प्रकल्पग्रस्त कामगारांनी विविध आंदोलन केलीत. सर्वात प्रथम टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. नंतर चंद्रपूरपर्यंत पायदळ यात्रा, भिक मांगो आंदोलन व दहा दिवसांचे जेल भरो आंदोलन प्रकल्पग्रस्त राजू डोंगे यांच्या नेतृत्वात कामगारांनी केली. तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नाही. या सर्वच आंदोलनात रामा मत्ते, रवींद्र डोंगे, निलेश रामटेके, प्रभाकर कुळमेथे, संदीप घुगुल, पांडूरंग सातपुते, मोहन दरेकर, दिनेश वानखेडे, अरविंद देवगडेव अन्य कामगारांचा सहभाग होता. शेतजमिनही गेली व पगारही नाही अशा बिकट संकटात आज हे कामगार सापडले आहेत.
सध्या सदर खाण पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली दिसत आहे. परंतु जोपर्यंत केपीसीएलच्या आस्थापनेवर होणार नाही तोपर्यंत खाणीचे काम सुरू करू नका अशी राजू टोंगे यांची मागणी आहे.